पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या निर्बंधात शिथिलता आल्याने प्रथमच महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र भिमाशंकर येथे देशभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक येण्याची शक्यता आहे. सोमवार व महाशिवरात्रीचा दिवस, असे 28 फेब्रुवारी व 1 मार्च दोन भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी व वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने वाहनतळाची सुविधा करण्यात आली असून बेशिस्तपणे वाहन लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने दिला आहे.
या ठिकाणी आहे वाहने उभे करण्याची सोय - महाशिवरात्रीपूर्वी रस्त्याचे झालेले काम व देवस्थान विकास आराखड्यातील सुरू असलेल्यात कामांच्या पार्श्वभूमीवर ही व्यवस्था करण्यात आली आहे. टेम्पो, बस, मिनीबस यांसारख्या मोठ्या वाहनांसाठी हॉटेल शिवामृत येथे व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनतळ क्र. 2 येथे दुचाकी उभी करण्याची सोय करण्यात आली आहे तर चारचाकी वाहनांसाठी वाहनतळ क्र.3 येथे सोय करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक माने यांनी दिली.
क्रेनचे भाडे वाहनधारकाकडून वसूल करण्यात येईल - वाहने लावलेल्या ठिकाणापासून एस.टी. महामंडळाच्या बसेसमधून महाद्वार एस.टी.स्टॅण्डपर्यंत भाविकांना ने-आण करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी वाहनतळ ठिकाण सोडून इतरत्र बेशिस्तपणे वाहने लावल्यास ते वाहन बाजूला करण्यासाठी दोन क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. या दरम्यान वाहनाचे काही नुकसान झाल्यास वाहनधारकच जबाबदार असतील व क्रेनचे भाडेही वाहनधारकाकडून वसूल करण्यात येईल, असेही माने यांनी सांगितले.
साध्या वेशात पोलीस देतील गस्त - श्री क्षेत्र भिमाशंकर येथे साखळी चोर (चैन स्नॅचिंग) व पाकीटमार करणारे, छेडछाड करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे व चित्रीकरण करणारी पथके नेमण्यात आली आहे. तसेच विशेष लक्ष देण्यासाठी दिवसा व रात्री साध्या वेशातील पथके नेमण्यात आली आहेत. तसेच अवैध दारू व भांग विक्री करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात आली असून राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत.
हेही वाचा - सहा महिन्यांपासून मुख्यमंत्री घराबाहेरच निघाले नाही, त्यामुळं... रावसाहेब दानवेंचा आरोप