पुणे - खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्याच्या पश्चिमभागात भात लागवड केली जाते. मात्र, याठिकाणी भात लावणीसाठी वेळेवर मजूर भेटत नाहीत. या अडचणीवर मात करण्यासाठी आदिवासी विकास विभाग, बोरलॉग इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ एशिया(बीसा) यांच्या सहयोगाने 'हवामान संपूरक खेडी विकास कार्यक्रमां'तर्गत यंत्राद्वारे भात लागवड यंत्र विकसित करण्यात आले आहे. याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले असून शेतकऱ्यांना या यंत्राचा फायदा होत आहे.
खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात भात लागवड केली जाते. मात्र, लावणीच्यावेळी अनेकदा मजूरांची कमतरता भासते. या मजूर टंचाईवर मात करण्यासाठी भात लावणी यंत्र विकसित करण्यात आले आहे. या यंत्राच्या माध्यमातून दोन माणसांच्या मदतीने दिवसभरात चार एकर शेतात भात लावणी करता येते. याची प्रात्यक्षिके जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात सुरू आहेत. पारंपारिक पद्धतीने भात लावणी केल्यास एक एकर क्षेत्राला अंदाजे 30 किलो बियाण्यांची रोपे लागतात. मात्र, या मशिनच्या माध्यमातून लागवड करताना नर्सरी पद्धतीची मॅट तयार केल्यास केवळ 15 किलो बियाणांच्या रोपांमध्येच एक एकर भात लागवड होत असल्याचे यंत्र अभ्यासक सागर गायकवाड यांनी सांगितले.
या यंत्राद्वारे भात लागवड केल्याने कमी बियाणे, कमी मेहनत, वेळेची व मजुरीची बचत होत आहे. भात रोपांची वाढही लवकर होत असून उत्पादन क्षमता वाढत असल्याचे, आदिवासी शेतकऱयांनी सांगितले. खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात 60 टक्के क्षेत्रात पारंपारिक पद्धतीने मजुरांच्या माध्यमातून भात लागवड होते. काही भागात सगुना म्हणजे (एसआरटी)व चारसुत्री पद्धतीने लागवड केली जाते. मात्र, आता आदिवासी शेतकरीही नवनवीन तंत्रज्ञान स्विकारण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढत आहे. कृषी विभाग नवनवीन उपकरणांचा एकसूत्री कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांच्या शेतावर बी बियाणे, औषधे उपलब्ध करून देत असल्याचे कृषी आधिकारी सतिष शिरसाट यांनी सांगितले.