पुणे Dhirendra Shastri : पुण्यात होणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून विरोध करण्यात आला आहे. अजित पवार गटाचे कार्यकर्ते सुदर्शन जगदाळे यांनी फेसबुक पोस्ट लिहित पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भूमीत अशा भोंदू बाबांना थारा नाही, अशा आशयाची पोस्ट लिहित धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाला अजित पवार गटाकडून विरोध करण्यात आला आहे. (Maharashtra Superstition Eradication Committee)
तर पवार, भाजपात वाद उद्भवणार : भाजपाचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यातर्फे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. एकीकडे कार्यक्रमाची जय्यत तयारी तर दुसरीकडे कार्यक्रमाला विरोध होत आहे. अजित पवार गट आणि भाजपा एकत्र सत्तेत असल्यानं नवा वाद उभा राहणार असल्याचं जाणवत आहे. यावरून आता पुण्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
अजित पवार गट, अंनिसचा विरोध : पुण्यातील संगमवाडी भागात २० नोव्हेंबरपासून तीन दिवस बागेश्वर बाबांचा कार्यक्रम आहे. त्यावेळेस आता हा विरोध किती प्रमाणात तीव्र होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेसुद्धा याला विरोध केलाय. अशा ढोंगी बाबांना महाराष्ट्रात येऊ देऊ नका. आमचा त्याला विरोध आहे, अशी भावना अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं व्यक्त केली आहे. अजित पवार गट आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या विरोधामुळे या कार्यक्रमावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. दुसरीकडे पुणे पोलिसांवरसुद्धा मोठा ताण निर्माण झाला आहे. याबाबतीत आता काय होतं ते पाहणं महत्त्वाचं आहे.
अंनिसनं याआधी दिलं होतं आव्हान : मागील वर्षी नागपूर येथे धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने बाबांना चमत्कार दाखवण्याचं आव्हान देण्यात आलं होतं. मात्र, आव्हान न स्वीकारताच धीरेंद्र शास्त्री दोन दिवस आधीच शहरातून निघून गेले. याआधी अनेक वेळा अशाच पद्धतीनं त्यांना आव्हान देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी स्वीकारलं नाही. छत्रपती संभाजीनगर शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कोणतेच लोक माझ्यापर्यंत आलेले नाहीत, असा दावा केला. अंनिसचे सर्व लोक फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी काम करतात, ते समोर आले तर मी त्यांचं आव्हान स्वीकारेन, असा दावा धीरेंद्र शास्त्रींनी केला होता. मात्र असा कुठलाच निरोप आमच्यापर्यंत कधीही आलेला नाही. उलट अंनिसनं अनेक वेळा आव्हान दिलं असताना त्यांनी ते स्वीकारलेलं नाही. आम्ही रजिस्टर पोस्टमार्फत लेखी स्वरूपात त्यांना आव्हान दिलेलं आहे. बाबांनी आम्हाला लेखी दिलं, तर आम्ही स्वतः जाऊन आमचं आव्हान त्यांना सांगू, अशी माहिती अंनिसचे मराठवाडा संघटक किशोर वाघ यांनी दिलीय.
असं आहे आव्हान : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर शहरात पत्रकार परिषदेचं आयोजन करून धीरेंद्र शास्त्री यांना जाहीर आव्हान देण्यात आलं आहे. धीरेंद्र शास्त्री आपल्या दरबारात लोकांचं भविष्य सांगतात. आम्ही तेच सिद्ध करण्याची मागणी त्यांना केली आहे. महाराजांनी फक्त आपला दिव्य चमत्कार वापरून आम्ही दिलेली माहिती ओळखावी. त्यांचा चमत्कार सिद्ध झाल्यास आम्ही राज्यात सुरू असलेलं कामदेखील बंद करू, असं अंनिसच्या वतीनं सांगण्यात आलं. बाबांना खरच दिव्य शक्ती प्राप्त असेल, तर देशाला फायदा होईल. आपल्यावर होणारे हल्ले, येणारी संकटं आधीच कळतील. त्यामुळं बाबांनी आमचं आव्हान स्वीकारावं, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केलीय.
हेही वाचा: