पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव होणार की नाही, या संभ्रमात सगळेच आहेत. दरम्यान, गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या ऑनलाईन बैठकीमध्ये पुण्यातील मानाच्या व प्रमुख गणेश मंडळांच्या अध्यक्षांनी सहभाग घेतला. यावेळी शासन निर्णयानुसार व लोकहित लक्षात घेऊन यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी केले. तसेच लॉकडाऊनचे निर्बंध आणखी शिथील झाल्यानंतर पुण्यातील इतरही गणेशोत्सव मंडळांशी चर्चा करुन उत्सवाची अंतिम रुपरेषा ठरविली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या गणपती भवन येथील इमारतीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मानाच्या व प्रमुख गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्षांनी संवाद साधला. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, कोरोना विषाणूचा प्राद्रुर्भाव वाढत असताना महाराष्ट्र शासन, पोलीस व आरोग्यसेवक उत्तमरितीने काम करीत आहेत. शासन जो निर्णय देईल त्यानुसार आम्ही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करु. गणेशोत्सव मंडळे ही शासनासोबत आहेत. यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय पुण्यातील मानाचे पाच व प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी घेतला. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनीदेखील मंडळांचे अभिनंदन केले आहे.
अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात म्हणाले, शासन निर्णयानुसार व लोकहित लक्षात घेऊन आरोग्यदायी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यापुढील काळात पुण्यातील इतर गणेशोत्सव मंडळांसोबत चर्चा करुन एकत्रितपणे साधेपणाने व निर्विध्नपणे उत्सव कसा करता येईल, यादृष्टीने काम करण्याचे त्यांनी सांगितले.
याबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, गणेशोत्सवाची परंपरा खंडित होऊ न देता आपल्याला उत्सव साजरा करायचा आहे. यंदा मिरवणूका न काढता दहा १० दिवस आरोग्यदृष्टया मंडळांनी काम करायला हवे. ज्याप्रमाणे पालखीसोहळा म्हणजेच वारीला परवानगी देता आली नाही, त्याप्रमाणे गणेशोत्सवात मिरवणुकांनादेखील परवानगी देणे यंदा शक्य नाही. यंदाचा उत्सव वाजतगाजत शक्य नाही. त्यामुळे, गणेशोत्सव साधेपणाने म्हणजे नेमका कसा, याविषयी मार्गदर्शक तत्त्वे आपण ठरवायला हवी. ती तत्वे ठरवून त्यावर चर्चा करुन पुन्हा बैठक घेऊन अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब करु, असे त्यांनी गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, प्रशासन, पोलीस यांच्याशी संवाद साधताना सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, यंदा कोरोना आणि पाऊस अशा दोन गोष्टींसोबत आपल्याला लढाई लढायची आहे. उत्सवाची परंपरा कायम ठेऊन स्वरुपात बदल करावे लागतील. प्रत्येकाने आपापल्या घरातून गणरायाचे पूजन करावे, अशी जागृती आपल्याला करावी लागले. अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न आपल्याला करायला हवा. लवकरच याबाबत बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.