पुणे - यापुढे ओबीसी समाजाच्या वतीने मोर्चे आणि आंदोलन करण्यात येणार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी औरंगाबादमध्ये केले होते. समीर भुजबळ यांच्या या वक्तव्यावरून ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. समता परिषद म्हणजे ओबीसी समाज नव्हे, शिवाय भुजबळांचे आंदोलन हे सरकारी आंदोलन असल्याचा आरोप ओबीसी व्हिजेएनटी जनमोर्चाने केला आहे.
'समता परिषद म्हणजे ओबीसी समाज नाही'
शुक्रवारी औरंगाबादमध्ये ओबीसी समाज बचाव आरक्षण मोर्चा काढण्यात आला होता, यावेळी पुढच्या काळात ओबीसी मोर्चे आणि आंदोलन निघणार नसल्याची घोषणा समीर भुजबळ यांनी केली होती, त्यावर आता इतर ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. समता परिषद म्हणजे ओबीसी समाज नाही, ओबीसी समाजाच्या कोणत्या मागण्या सरकारने मान्य केल्या हे समीर भूजबळांनी सांगाव, आम्हाला त्यांची भूमिका मान्य नाही, आम्ही पुढच्या काळात मोर्चे आणि आंदोलन करणार असल्याची भूमिका इतर ओबीसी संघटनांनी घेतली आहे. मराठ्यांचे ओबीसीकरण नको म्हणून आम्ही राज्यात सर्व जिल्ह्यात बैठका घेऊन जनजागृती करणार असल्याची माहिती ही ओबीसी नेत्यांनी दिली आहे.
26 डिसेंबरला ओबीसी समाजाचे शक्तीप्रदर्शन
ओबीसी समाजाला महाविकास आघाडी सरकारने काय दिलं, असा सवाल ओबीसी संघटनांनी सरकारला केला आहे. त्यामुळे येत्या 26 डिसेंबरला अहमदनगरला मंत्री विजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीत ओबीसी समाजाचे जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार असल्याचे ओबीसी व्हिजेएनटीने संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी सांगितले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री शब्दछळ करत असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केला आहे. ओबीसी समाज आपल्या हक्कांसाठी यापुढेही मोर्चे, आंदोलने सुरूच ठेवणार असल्याचा इशारा ओबीसीही व्हीजेएनटी जनमोर्चाने सरकारला दिला आहे.