पुणे - आळंदीत शुक्रवारी सायंकाळी श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर चंदनउटीतून माउलींचे नृसिंह अवतारातील वैभवी रूप साकारण्यात आले. निमित्त होते नृसिंह जयंतीचे. श्रींचे हे वैभवी रूप पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली. यावेळी देवाच्या आळंदीत श्री नृसिंह जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला.
नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मठ आणि माऊली मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रींच्या समाधीवर चंदनउटी लेप लावण्यास चैत्रात सुरुवात होते. नृसिंह जयंतीनिमित्त श्रींचे संजीवन समाधीवर आकर्षक वस्त्रालंकार वापरून श्रींचे वैभवी रूप श्रींचे चंदनउटीतून साकारले. आळंदी मंदिरात भाविक, नागरिक, साधक यांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. आळंदी देवस्थान संस्थानच्या प्रथेप्रमाणे मंदिरात नृसिंह जयंतीचे नियोजन केले.
नृसिंह जयंतीनिमित्त माऊली मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत जन्मोत्सवास उत्साहात सुरुवात करण्यात आली. यावेळी कीर्तन झाले. मंदिरात प्रथम घंटानाद, काकडा, श्रींना पवमान अभिषेक व दुधारती झाली. दरम्यान, भाविकांच्या पूजा आणि दर्शनास गाभारा मोकळा करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास चंदनउटी दर्शन खुले झाले. श्रीनृसिंह जन्मोत्सवानिमित्त श्रींना वैभवी पोशाख करण्यात आला. जन्मोत्सव कीर्तन, आरती, महानवेद्य, प्रसाद वाटप, मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आले. विविध वस्त्रालंकार, आभूषणे आणि नयनमनोहर पुष्प सजावटीने साकारलेले श्रींचे लक्षवेधी रूप भाविकांनी आपल्या नेत्रात साठविले. धूपारती झाल्यानंतर रात्री जागर करण्यात येणार आहे.