Nepal Earthquake : पुणे शहरातील जवळपास 39 प्रवासी नेपाळमध्ये फिरण्यासाठी गेले होते ते देखील यामध्ये अडकले होते.काही काळ त्यांचा पुण्यातील नातेवाईकांशी संपर्क न झाल्यामुळं नातेवाईकांनी चिंता व्यक्त केली होती. मात्र, आज (4 नोव्हेंबर) सकाळी संपूर्ण प्रवासी सुखरुप असल्याची माहिती समोर आली आहे.
सर्व प्रवासी सुरक्षित : पुण्यातील बाणेर परिसरातील एकूण 39 जणांची टूर 'पुणे अर्चिस इंटरनॅशनल टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनी'च्या माध्यमातून नेपाळ दौऱ्यावर काही दिवसांपूर्वी गेली होती. शुक्रवारी रात्री नेपाळच्या चितवन येथील सौरह परिसरातील रॉयल सफारी या हॉटेलमध्ये विश्रांतीसाठी ते थांबले होते. रात्री विश्रांती घेत असताना अचानक 11 वाजून 55 मिनिटांनी हॉटेल मधील बेड हलू लागले आणि इतर साहित्य देखील जोरात हलू लागले. या संपूर्ण घटनेनं संपूर्ण हॉटेलमधील लोकं घाबरले अन् हॉटेलच्या बाहेर निघत एका मोकळ्या ठिकाणी जमा झाले. पुण्यातील हे सर्व 39 नागरिक देखील एका मोकळ्या ठिकाणी येऊन जमा झाल्यानंतर त्यांना समजलं की नेपाळमध्ये तीव्र भूकंप आलाय. त्यानंतर लागलीच सर्व प्रवाशांनी तेथून निघत गोरखपूरकडं प्रस्थान केलं यादरम्यान त्यांचा काही काळ पुण्यातील नातेवाईकांची संपर्क तुटला होता. त्यामुळं नातेवाईकांनी चिंता व्यक्त केली होती. मात्र, आज सकाळी हे सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती त्यांना मिळाली आहे.
प्रत्यक्षदर्शींची प्रतिक्रिया : प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, रात्री अचानक हॉटेलमधील वस्तू खाली पडू लागल्या. आम्ही सगळे घाबरलो होतो, मात्र आम्ही धीर न सोडता सर्वजण हॉटेलमधून लगेच सामान घेऊन एका मोकळ्या ठिकाणी जमा झालो आणि लागेच तिथून आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. मध्यरात्री रस्त्यावरून प्रवास करत असताना आम्ही डोंगराच्या कडेने प्रवास करत होतो तेव्हा आमच्या मनात भीती होती की, भूकंपाच्या तीव्रतेमुळं डोंगरावरून दरड आमच्या अंगावर पडू नये. मात्र जीव मुठीत घेऊन आम्ही प्रवास करत निघालो आणि सुखरूप गोरखपूरच्या दिशेनं मार्गस्थ झालो आहोत.
नेपाळमध्ये हाहाकार : दरम्यान, नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झालाय. त्याचे धक्के भारताची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागात जाणवले. या विनाशकारी भूकंपात नेपाळमध्ये आतापर्यंत तब्बल 128 जणांचा मृत्यू झालाय. नेपाळमधील रुकुम पश्चिम इथं 28 तर जाजरकोटमध्ये 20 जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री 11.32 च्या सुमारास झालेल्या भूकंपामुळे लोकांना घराबाहेर पडावे लागले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमधील अयोध्येपासून सुमारे 227 किमी उत्तरेस आणि काठमांडूपासून 331 किमी पश्चिम उत्तर-पश्चिम 10 किमी खोलीवर होता. नेपाळमध्ये महिनाभरात तिसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसला आहे.
हेही वाचा -