पुणे - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान चाकण येथे झालेल्या हिंसाचार दंगल प्रकरणी, खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना संशयित आरोपी करण्यात आले होते. या प्रकरणी त्यांनी चाकण येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर गुरुवारी सुनावणी घेण्यात आली. आज राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. अंबळकर यांनी मोहिते-पाटील यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
काल राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. अंबळकर यांच्या कोर्टासमोर वकील अँड. हर्षद निंबाळकर यांनी मोहिते यांची बाजू मांडली. तर सरकारच्या बाजूने सरकारी वकील अरूण ढमाले यांनी युक्तिवाद केला. दोघांचेही म्हणणे ऐकून घेतल्यावर आज निर्णय देत न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे.
मोहिते यांचे वकील अंबळकर आपली बाजू मांडताना म्हणाले की, 'चाकण येथे सभास्थळावर इतर नेत्यांबरोबर मोहिते यांचेही भाषण झाले होते आणि त्यानंतर ते पुण्याला पीडीसीसी बँकेच्या बैठकीसाठी निघून गेले. त्यांच्या भाषणात त्यांनी लोकांना भडकविले तर नाहीच, उलट शांततेचे आवाहन केले होते. पोलिसांनीच दाखल केलेल्या एफआयआरमध्ये मोहितेंबाबत काहीही उल्लेख नाही. त्यानंतर ८३ आरोपी अटक केले त्यांच्या जाबजबाबामध्ये मोहितेंचा उल्लेख नाही. आता अचानक एक वर्षानंतर मोहिते आरोपी असल्याचा पोलिसांना साक्षात्कार झाला आणि त्यांच्यावर कटकारस्थान केल्याचे कलम वाढवून मोहितेंना आरोपी करण्यात आले आहे.'
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहितेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झाली असून मोहितेंच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे.