पुणे - आषाढी वारीच्या सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. आज तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. या सोहळ्यात प्रत्येकजण आपल्या परीने काही न काही सेवा करण्याचा प्रयत्न असतो. देहू नगरीतही गेल्या ५० वर्षांपासून वारकऱ्यांना नवश्या गणपती मंडळाकडून अन्नदान करण्यात येते. आजही ही परंपरा कायम आहे.
पालखी प्रस्थानासाठी सोमवारी लाखो वारकरी भाविक देहूमध्ये दाखल झाले आहेत. नवशा गणपती मंडळाने तब्बल २० हजार वारकऱ्यांना अन्नदानाची सेवा दिली आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा ३३४ वा पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडत असताना लाखो वारकरी गेल्या २ दिवसांपासून देहूनगरीत दाखल होत आहेत. अनेकदा त्यांच्या जेवणाची भ्रांत असते. वेळेवर जेवायला मिळत नाही. अशा वेळी नवशा गणपती मित्र मंडळ गेल्या ५० वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा करत आहे. त्यांना मोफत जेवण दिले जाते. यामुळे वारकऱ्यांकडून मिळणारा आशीर्वाद हेच सर्व काही असल्याचे पदाधिकारी सांगतात.
मंदिराच्या मुख्य द्वारासमोरच नवश्या गणपती मित्र मंडळ असून, ते गेली ५० वर्ष अविरतपणे वारकऱ्यांची सेवा करत आहेत. वारकऱ्यांना तांदळाची खिचडी, पापड आणि भाजी मोफत दिली जाते. नवश्या गणपती मंडळाचे सदस्य आणि पदाधिकारी पैसे जमा करून वारकऱ्यांना पोटभर जेवण देतात. या उपक्रमामुळे वारकरी देखील भारावून गेले असून, जेवणाचा आनंद घेत आहेत. अन्नदान केल्याने समाधान मिळत असल्याचे पदाधिकारी सांगतात. त्यांच्या या उपक्रमामुळे वारकऱ्यांना पंढरपूरकडे चालण्यास बळ मिळते, अशा भावना वारकऱ्यांच्या आहेत.