पुणे Navale Bridge Accident : सांगलीवरुन भुसा घेऊन गुजरातला निघालेला भरधाव ट्रक कंटेनरला धडक दिल्यानंतर पेटल्यानं भीषण अपघात झाला. ट्रकनं पेट घेतल्यानंतर कॅबीनमध्ये बसलेले चार जण होरपळून मृत झाल्यानं मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना नवले पुलावर सोमवारी रात्री 9.00 वाजताच्या दरम्यान घडली. दरम्यान पुण्यातील नवले पूल हा मृत्यूचा सापळा बनला आहे. आतापर्यंत या पुलावर अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कशी घडली घटना : सांगली इथून गुजरातला भुसा घेऊन निघालेला ट्रक पुण्यातील नवले पुलावरुन भरधाव जात होता. यावेळी नवले पुलावरील स्वामी नारायण मंदिराजवळ ट्रकचालकाचं भरधाव ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं त्यानं कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. मात्र धडक इतकी भीषण होती, की अपघातानंतर भुसा भरलेल्या ट्रकनं पेट घेतला. त्यामुळे ट्रक जागीच जळून खाक झाला.
- चार जणांचा होरपळून मृत्यू : मृतात दोन महिला आणि एका चिमुकल्यासह एका पुरुषाचाही समावेश आहे. या चारही जणांचा ट्रकच्या कॅबीनमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची माहिती सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली आहे. दोन जण अत्यवस्थ असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली आहे.
आगीवर नियंत्रण मिळवल्यानं टळला अनर्थ : आग लागल्यानंतर तत्काळ अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं होतं, असंही पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी यावेळी सांगितलं. तर अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवल्यानं पुढील अनर्थ टळल्याची माहिती पुणे महापालिका अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफाडे यांनी दिली. नवले पुलावर अपघात झाल्यानं वाहतून इतर मार्गानं वळवण्यात आल्याचं पुणे पोलीस विभाग तीनचे पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा यांनी यावेळी सांगितलं आहे.
हेही वाचा :