पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊनमुळे उद्योग व्यवसायांसह शेतीउद्योग संकटात सापडला आहे. मोठ्या भांडवली खर्चातून उभारलेला मशरुम उद्योग संकटात सापडला असून कोट्यवधी रुपयांचे मशरुम फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
शिरुर तालुक्यातील आंधळगाव येथे आदिक कुसेकर या शेतकरी पुत्राने आपल्या शेतात मशरुम उद्योग सुरू केला आहे. या उद्योगातून प्रतिदिन दीड टनाचे उत्पादन मिळू लागले. शहरातील हॉटेल्स , मॉलमध्ये चांगली बाजारपेठ उभी राहिली. हा व्यवसाय नावारूपाला येत असताना कोरोनाचे संकट संपूर्ण देशावर आल्याने अचानक लॉकडाऊन झाले. त्यामुळे मशरुमची मागणी ठप्प होत गेली आणि रोजचे मशरुमचे होणारे उत्पादन फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
मशरुमच्या एका बॅचच्या लागवडीचा खर्च, कामगारांचा पगार, वीजबील, पॅकेजिंगचा खर्च, वाहतूक असा दरमहा ५२ लाख ४५ हजार रुपये खर्च येतो. यातून प्रतिमहिना ५० टनापर्यत उत्पादन मिळून यातून आठ लाख रुपयांपर्यंत नफा मिळतो. या नफ्यातून कर्जाचे हप्ते भरले जातात. मात्र सध्याच्या लॉकडाऊनमध्ये सरासरी एक कोटी ९० लाखांचा तोटा झाला असून मशरुम उद्योगांना उभारी देण्यासाठी सरकारने मदतीचा हात देण्याची गरज आहे. मशरुम पिकाचा कालावधी हा चार ते पाच दिवसांचा असतो. त्यामुळे मशरुम काढणीनंतर चार दिवसांत ग्राहकांपर्यंत पोहचवणे आवश्यक असते.
मशरुमला प्रामुख्याने हॉटेल, मॉलमध्ये मोठी मागणी असते. किरकोळ विक्रीला प्रतिसाद मिळत नसून सध्या हॉटेल्स आणि मॉल्स बंद असल्याने मशरुम व्यवसाय टप्प झाला आहे. मशरूमला लॉकडाऊन अगोदर साधारणपणे १४० ते १७० रुपयांचा दर मिळत होता. सध्या ग्राहकांना किरकोळ विक्री होत असून, त्यासाठी उत्पादकांना केवळ ४० रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे विक्री करणे परवडत नसल्याने मशरुम फेकून द्यावा लागत आहे, असे येथील मशरूम उत्पादक आदिक कुसेकर यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यात १० ते १२ मशरूम उत्पादन प्रकल्प असून त्यांची सरासरी उत्पादन क्षमता प्रतीदिन दीड टन पर्यत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात सर्व उद्योगांतून दोन हजार टन मशरुम फेकून द्यावा लागला आहे.
यातून मशरूम उत्पादकांचे सुमारे २५ ते ३० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कोरोनाच्या संकटातून देशातील प्रत्येक उद्योग व्यवसाय संकटातून जात असताना सरकारने या शेतीपुरक व्यवसायाला उभारी देण्यासाठी मदतीचा हात देण्याची गरज आहे. अन्यथा पुढील काळात या उद्योगांना चालना मिळणार नाही, हेच या निमित्ताने सांगावे लागेल.
मशरूम उत्पादकांच्या मागण्या...
•मशरूमला इतर पिकांप्रमाणे विमा संरक्षण मिळावे.
•टाळेबंदीच्या काळातील वीज बिल माफ करावे.
•पुन्हा उभारी धरण्यासाठी बँकांकडून खेळते भांडवल उपलब्ध करून द्यावे.
•एक टन क्षमतेच्या प्रकल्पासाठी ५० लाख खेळते भांडवल मिळावे.
•भांडवलाचे दीर्घकालीन कर्जात रुपांतर करावे आणि त्याची हमी राज्य सरकारने घ्यावी.
•मशरुम उत्पादकांना तत्काळ अनुदान द्यावे.