पुणे- शहरात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पण काही हॉटेल व्यवसायिक या नियमांचे पालन करताना दिसून येत नाही. अशा ४७ हॉटेल व्यवसायिकांवर पालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे. यात पुण्यातील प्रसिद्ध अश्या वैशाली, रुपाली हॉटेलचा सामावेश आहे.
कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल व्यवसायिकांवर कारवाई
सध्या पुण्यात कोरोनाची रुग्ण संख्या सातत्याने वाढत आहे. त्यासाठी नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन सातत्याने करण्यात आले आहे. परंतु काही हॉटेल व्यावसायिक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पुणे महानगरपालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी मनीषा नाईक म्हणाल्या. त्यामुळे महापालिकेने नियम न पाळणाऱ्या हॉटेलवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. मागील पाच दिवसात शहरातील अनेक हॉटेलची आरोग्य विभागाच्या पथकाने पाहणी केली असता त्या ठिकाणी सर्रास नियमांचे उल्लंघन होताना दिसून आले. यामध्ये मास्क लावण्यास सक्ती न करणे, सोशल डिस्टन्स न पाळणे, सॅनिटायझरचा वापर न करणे यासारखे प्रकार घडत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या हॉटेल व्यवसायिकांविरोधात महापालिकेने दंडात्मक कारावाईचा बडगा उगारला आहे.