पुणे - मान्सूनच्या प्रगतीसाठी सध्याचे वातावरण पोषक आहे. येत्या एक जूनला मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. तर आठ जूनला हा मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. यानंतर 16 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर राज्यातील तापमानात आजपासून (शुक्रवार) घट होणार आहे.
30 मे पासून पुढील तीन दिवस राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हा मान्सूनपूर्व पाऊस असेल, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.
पुणे आणि जिल्ह्यात 30 मे रोजी दुपारनंतर विजांचा कडकडाटासह पावसाला सुरुवात होईल. 31 मेपासून पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट होणार आहे. वाऱ्यामुळे झाडेही पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. 55 ते 64 मिलीमीटर एवढा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हीच स्थिती मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात राहणार आहे. कोकण, गोव्यामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
हेही वाचा - अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द कराव्यात; कुलगुरू समितीचा अहवाल
पुणे, विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील तापमानही कमी होणार आहे. पश्चिम भागातील हवा वाहू लागल्यानंतर पुण्यातील तापमान 40 अंशापर्यंत खाली येईल. तर विदर्भातील तापमान 30 तारखेपर्यंत खाली येईल. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात 29 आणि 30 तारखेला तापमान खाली येणार आहे.