पुणे - महापालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयातील अतिदक्षता विभाग अद्याप रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध नाही. तो रुग्णांसाठी सुरू करावा तसेच व्हेंटीलेटर व ऑक्सिजन बेडची सुविधा करावी, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी केली आहे. जर लवकर अतिदक्षता विभाग सुरू केला नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पुण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांना व्हेंटिलेटर मिळत नसल्याने मृतांचा आकडा वाढत आहे. पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात अति दक्षता विभाग व व्हेंटिलेटर ,ऑक्सिजन बेडची सुविधा काही महिन्यांपूर्वी सुरू होणार होते. पण, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हट्टामुळे हा विभाग अजूनही सुरू करण्यात आलेला नाही. इतका खर्च करून उभारलेले अतिदक्षता विभाग अजुनही सुरू नाही, हे पुणेकरांचे दुर्दैव आहे. लवकरात लवकर कमला नेहरू रुग्णालयातील अतिदक्षता विभाग सुरू करा, अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने आंदोलन करेल, असा इशारा मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी दिला आहे.