पुणे (पिंपरी-चिंचवड) - भोसरी व्हीजन- २०२०' अंतर्गत आंद्रा- भामा आसखेड प्रकल्प, संतपीठ आणि स्पाईन रोडबाधित नागरिकांचे पुनर्वसन आदी विकासकामांना गती देण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत आमदार महेश लांडगे यांनी महापालिका भवनात आज मॅरेथॉन बैठक घेतली. यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, नगर रचना विभागाचे राम पवार यासह अनधिकृत बांधकाम, स्थापत्य आदी विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार लांडगे म्हणाले की, स्पाईन रस्ताबाधित १३२ कुटुंबियांच्या पुनस्थापणेचा विषय तात्काळ मार्गी लावला पाहिजे. त्यासाठी बाधित कुटुंबीयांकडे सातबारा नसल्यास 'इंडेक्स-२' दाखवून जमीन ताब्यात देणे, लिस्ट डिड अटी व शर्ती भूमी जिंदगी विभागाने तयार कराव्यात. त्यानंतर सर्व जबाबदारी नगर रचना विभागागाडे सोपवण्यात येईल. तसेच, महापालिका आयुक्तांच्या आदेशाने 3 फेजद्वारे जमीन ताबा देण्याचे काम सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
चिखली येथे साकारण्यात येणारे संतपीठ हे पिंपरी- चिंचवडकरांच्या श्रद्धेचा विषय आहे. या शहराला श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आळंदीचा वारसा लाभला आहे. वारकरी सांप्रदाय आमची अस्मिता आहे. त्यामुळे संतपीठ उभारणीच्या कामाला लवकर सुरुवात करा, अशा सूचना आमदार लांडगे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. यावर संबंधित अधिकारी यांनी प्रत्येक 10 दिवसाला कामाच्या सध्यस्थीतीबाबत आढावा द्यावा, असा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरवासीयांच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे...
पिंपरी- चिंचवडमधील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला आंद्रा आणि भामा-आसखेड पाणी प्रकल्प गतिशील करण्याबाबत आमदार लांडगे यांनी आग्रही भूमिका घेतली. या बैठकीत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रकल्पाचे सोशल ऑडिट करणे, एमायडीसी संबंधित असलेली कामे मार्गी लावण्याबाबत अधिकारी देशमुख यांच्यासोबत बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यासह भोसरीमधील इतर रस्ते आणि सोसायटी प्रलंबित प्रश्न यावर लवकर कामे पूर्ण करून घेण्यासाठी आमदार लांडगे यांनी अधिकाऱ्यांना बजावले आहे.