शिरूर (पुणे) - 'रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील फियाट इंडिया व टाटा मोटर्स यांचा संयुक्त मोटर निर्मितीचा प्रकल्प आहे. या उद्योगांकडे पाहिल्यानंतर ज्या पद्धतीने वाहन उद्योग औद्योगिक तंत्रज्ञानातून केलेली उभारणी थक्क करणारी असून या उद्योगांकडून पर्यावरणाचे होणारे रक्षणही थक्क करणारे आहे'असे मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. ते आज रांजणगाव येथील उद्योग समूहांचा पाहणी दौरा व वृक्षारोपण कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील व एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
उद्योगांकडून पर्यावरणाचे होणारे रक्षण कौतुकास्पद
रांजणगाव एमआयडीसी परिसरात उभारलेल्या उद्योगांकडून पर्यावरणाचे होणारे रक्षण कौतुकास्पद असून उद्योग परिसरातील एक इंचही जागा मोकळी न सोडता पर्यावरणपूरक वृक्षारोपण केले जात आहे या झाडांपासून मानवी जिवांसह वातावरणात स्वच्छ व पोषक वातावरण तयार करण्यासाठी मदत होते. त्यामुळे उद्योगांकडून जोपासले जाणारे पर्यावरण कामासाठी प्रोत्साहन देणार आहे. त्यामुळे पुढील काळात अशाच पद्धतीने पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्षारोपणाची गरज असल्याचे मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले. या वेळी, उद्योगमंत्री सुभाष देसाई व कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
कोरोनानंतर उद्योग-व्यवसाय कठीण परिस्थितीतून गेले आहे. अशा कठीण संकटावर मात करत उद्योग-व्यवसायांनी उभारी घेतली आहे. वाहन उद्योग गगनभरारी घेत असताना परिसरातील छोटे-मोठे लघुउद्योगांना ही चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे उद्योगांच्या उभारीमुळे कामगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. वाहन उद्योगांचा हा चढता क्रम सुरू ठेवण्यासाठी सरकारच्या उद्योग प्रोत्साहन कार्यक्रमातून उद्योगांना चालना दिली जाणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
हेही वाचा - ग्रंथालयांसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल - मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई