मुंबई Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणावरुन मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षण मिळावं, म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आहे. मात्र मराठा आंदोलन आता हिंसक मार्गावर जात असल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या आंदोलकांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी अडवली आहे. नांदेडमध्ये खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची गाडी फोडली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्येच त्यांना गावबंदी करण्यात आली आहे.
अजित पवार यांना बारामतीतच गावबंदी : सकल मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्रात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. कोणतेही कार्यक्रम राजकीय घेऊ नये. माळेगाव कारखान्याचा मोळी पूजनाचा कार्यक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते घेण्यात येणार आहे. राजकीय पुढार्यांना बंदी असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा कार्यक्रम घेऊ नये. मात्र त्यानंतरही जर हा कार्यक्रम अजित पवारांच्या हस्ते झाल्यास मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्त्यांकडून विरोध केला जाईल. याला सर्वस्वी कारखाना प्रशासन आणि पोलीस प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं देण्यात आला आहे.
बारामतीतील 16 गावात साखळी अन्नत्याग आंदोलन : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारपासून उपोषण सुरु केलं आहे. त्यापाठोपाठ बारामतीत देखील मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजानं आता सुरवातीला बारामती शहर, तालुक्यात साखळी अन्नत्याग आंदोलन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापाठोपाठ 16 गावात साखळी उपोषण होणार आहे. बारामती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं रविवारपासून साखळी अन्नत्याग आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. यामध्ये साखळी उपोषण, एक दिवस लाक्षणिक अन्नत्याग आंदोलनाचा समावेश आहे.
या गावांचा आंदोलनात समावेश : बारामतीमधील शहर आणि तालुका रविवारी तसेच सोमवारी या उपोषणात सहभागी होणार आहे. यात खांडज, मळद, पाहुणेवाडी, नीरावागज, घाडगेवाडी इथं, मंगळवारी सांगवी, शिरवली, कांबळेश्वर, लाटे , शिरश्णे, बजरंगवाडी इथं तर बुधवारी माळेगाव, माळेगाव खुर्द, पणदरे, ढाकाळे, सोनकसवाडी या ठिकाणी साखळी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. बारामती शहरात नवीन प्रशासकीय भावनासमोर मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य एक दिवस लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं देण्यात आली. माळेगाव कारखान्याच्या शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणाऱ्या गळीत हंगाम शुभारंभाला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं विरोध करण्यात आला आहे. राजकीय व्यक्तींना सर्वत्र गावबंदी करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
हेही वाचा :