पुणे - वैशाख महिन्याची तृतीया म्हणजे 'अक्षय्य तृतीया'. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. एखाद्या नवीन कामाची सुरुवात अक्षय्य तृतीयेपासून केली जाते. कारण या तिथीला सुरू झालेली कामे किंवा केलेली कामे अक्षय्य राहते, अशी समाजामध्ये भावना आहे. 'अक्षय्य' या शब्दाचा अर्थ म्हणजे कधीही क्षय न होणारे, म्हणजेच कधीही न संपणारे होय. ज्या पद्धतीने सौर ऊर्जा म्हणजेच सूर्यापासून मिळणारी ऊर्जा अक्षय्य मानली गेली. त्याचप्रमाणे जल, वायू, अग्नी, तेज, पृथ्वी ही पंचमहाभूते अक्षय्य मानली गेली आहेत. पृथ्वी निर्माण झाल्यापासून लक्षवधी वर्षे लोटली. मात्र, या अक्षय्य गोष्टी आजही अस्तित्वात असून, जोपर्यंत पृथ्वी आहे, तोपर्यंत या गोष्टी कायम असतील, असे सांगितले जाते. त्यामुळे हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
अष्टविनायकापैकी एक असणारे तीर्थक्षेत्र 'श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट'च्या वतीने महागणपतीस पहाटे पाच वाजता अभिषेक व नैमित्तिक पूजा करण्यात आली. देवस्थानच्या वतीने दुपारी बारा वाजता महापूजा व महानैवेद्य करण्यात आला. तसेच हिंदू धर्म संस्कृती व रूढी परंपरेनुसार साडेतीन मुहूर्तापैंकी एक समजल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेनिमित्त दरवर्षी देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री महागणपतीला आंब्यांची आरास केली जाते. त्यानुसार यावर्षी श्रींना आंब्यांचा नैवेद्य दाखविण्यात आल्याचे देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॉ. संतोष दुंडे यांनी सांगितले.