पिंपरी-चिंचवड (पुणे) - देहूरोड परिसरातून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा खून झाल्याचे समोर आले आहे. तिचा मृतदेह देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाण्याने भरलेल्या दगडाच्या खाणीत सापडला आहे. या प्रकरणी विवाहित तरुणाला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. प्रिया शिलमान चव्हाण (वय- 20 रा. आदर्शनगर) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर, प्रशांत सूर्यकांत गायकवाड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
![प्रियकराने केला प्रेयसीचा मित्राच्या मदतीने खून](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-02-avb-murde-dehu-mh10024_27092020171604_2709f_1601207164_857.jpg)
आरोपी प्रशांत आणि मृत प्रिया यांच्यात प्रेम संबंध होते त्यांना एक मुलगीही झाली होती. तिच्या संगोपनावरून झालेल्या वादातून आणि मानसिक त्रासाला कंटाळून प्रशांतने प्रियाचा मित्राच्या मदतीने खून केला असल्याची कबुली पोलिसांना दिली. या प्रकरणी प्रशांतचा मित्र विक्रम रोकडे याला ताब्यात घेतले आहे. अद्याप आणखी एक आरोपी फरार आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.
हेही वाचा - ‘डीन’च्या खुर्चीवर अनधिकृतरित्या ताबा, सहयोगी प्राध्यापकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपासून मृत प्रिया बेपत्ता होती. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास देहूरोड पोलीस करत होते. तेव्हा, आदर्शनगर येथील पाण्याने भरलेल्या दगडाच्या खाणीत प्रियाचा मृतदेह आढळला. या प्रकरणी विवाहित प्रियकर प्रशांत ला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता. प्रिया आणि प्रशांत चे प्रेम संबंध होते, असे समोर आले. तर, प्रशांतचा विवाह झाला आहे, हे प्रेयसी प्रियाला माहीत होते. तसेच, ते प्रियाच्या कुटुंबालाही मान्य होते. त्यांना सहा महिन्यांपूर्वी मुलगी झाली. त्यानंतर त्यांच्यात वाद होण्यास सुरू झाले. मुलीच्या संगोपनावरून आणि खर्चावरून अनेकदा प्रिया आणि प्रशांत यांच्यात वाद झाले.दरम्यान, प्रशांत पत्नीसोबत राहात असलेल्या ठिकाणी प्रिया गेली. त्यावेळी प्रशांत घरी नव्हता. घरातील साहित्याची तोडफोड केली आणि घरी निघून आली. याच रागातून आणि मानसिक त्रासाला कंटाळून प्रियाचा खून करायचा, असा प्लॅन प्रशांतने मित्राच्या मदतीने आखला आणि शुक्रवारी तिच्या राहत्या घरातून आदर्शनगर येथील दगडाच्या खदानीपाशी प्रियाला आणून मित्राच्या मदतीने गळा आवळून त्यानंतर दगडाने ठेचून प्रियाचा खून केला. ही घटना मध्यरात्री उशिरा समोर आल्यानंतर आरोपी प्रशांतला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
हेही वाचा - 'मिशन सेव्ह लाइव्हज' : अत्याधुनिक सेवांमुळे मुंबईतील मृत्यूचे प्रमाण कमी