पुणे(बारामती) - बकऱ्यांच्या व्यवहारातील पैशावरून चौघांनी एका व्यक्तीवर चाकू व तलवारीने हल्ला केला. ही घटना बारामती तालुक्यातील ढाकाळे येथे घडली. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ज्ञानदेव राजाराम शिर्के(रा.ढाकाळे.ता,बारामती) यांना मारहाण झाली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गणेश मल्हारी चव्हाण, उमेश मल्हारी चव्हाण, शशिकला मल्हारी चव्हाण व एका अनोळखी व्यक्तीला (नाव पत्ता माहित नाही) सर्व राहणार ढाकाळे ता. बारामती यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण ?
फिर्यादी ज्ञानदेव शिर्के हे सकाळी १० वाजता ढाकाळे गावातील बस स्टॅडवर उभे होते. आरोपी गणेश चव्हाण हा त्यांच्या जवळ आला. 'तू माझ्या विरुध्द कोर्टात केस केली आहे. मी तुला पैसे देणार नाही', असे म्हणत आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ व हाताने मारहाण केली. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेला. दुपारी साडेबारा वाजता फिर्यादी घरी जात असताना पुन्हा आरोपींनी चाकू व लोखंडी गजाने मारहाण करून बकऱ्याचे पैसे मागायचे नाही, असे म्हणून फिर्यादीच्या उजव्या कानावर चाकूने वार केला. तर, लोखंडी गजाने डोक्यात मारले. फिर्यादी त्यांच्या तावडीतून पळून जात असताना एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादीच्या डोक्यात तलवार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने तलवार हुकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, असे करताना तो वार नाकावर बसून फिर्यादीला गंभीर दुखापत झाली.