पुणे - एकविरा देवीच्या गडावरील सैल झालेली दरड कोसळली. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सैल झालेले दगड काढण्याची सूचना वारंवार देऊनही प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे.
या ठिकाणी आई एकविरा देवीचे मंदिर असल्याने परिसरातील अनेक भाविक देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. देवीच्या मंदिरापासून अवघ्या काही फुटांवर दरड कोसळली आहे. त्या ठिकाणी अनेकदा भाविक थांबलेले असतात. गेल्या काही दिवसांपासून मावळ आणि लोणावळा परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. हा गड पुरातन असून त्याचा काही भाग सैल झालेला आहे. त्या ठिकाणाचीच दरड कोसळली आहे.
प्रशासनाकडून सैल झालेले दगड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीत भरगोस यश मिळाल्याबद्दल आपल्या विजयी खासदारसह शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दर्शन घेतले होते. मान्सूनच्या पूर्वी सैल झालेले दगड काढण्याची गरज आहे. याविषयी अनेक वेळा त्यांना माहिती देण्यात आली. मात्र, जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून जिल्हा प्रशासनाला इशारा देण्यात येत असून मंदिर परिसरात फिरकू देणार नसल्याचे म्हणाले आहेत.