पुणे - शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या एका विहिरीत पडल्याची घटना शिरूर तालुक्यातील फाकटे गावात घडली होती. तब्बल १९ तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले आहे. त्यानंतर वनविभागाने बिबट्याला सुखरुप मोकळ्या माळरानावर सोडले.
मध्यरात्रीच्या सुमारास रामदास भालेकर यांच्या शेताच्या बाजुला असणाऱ्या विहिरीत बिबट्या पडला. त्यानंतर बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पहाटेपासूनच बिबट्याच्या बचावासाठी नागरिकांचे प्रयत्न सुरु होते.
शिरुर, जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यात बिबट्याचे वास्तव्य दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बिबटे शिकारीच्या शोधात लोकवस्तीत येऊन वास्तव्य करु लागले आहेत. दिवसेंदिवस बिबट्यांची संख्याही वाढत चालल्याने लोकवस्तीत नागरिक व पाळीव प्राण्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, गावकऱ्यांच्या मदतीने बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले आहे. गावकऱ्यांनी बिबट्याची अशीच काळजी घेण्याची गरज असल्याचे बिबट्या निवारण केंद्राचे डॉ. अजय देशमुख यांनी सांगितले.