पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले वकील संजीव पुनाळेकर यांना पाठिंबा देण्यासाठी आता समस्त अधिवक्ता महाराष्ट्र या नावाने वकिलांची आघाडी पुढे आली आहे. संजीव पुनाळेकर यांना झालेली अटक हे एक षड्यंत्र आहे. वकिलांच्या न्यायिक अधिकारांचा सीबीआयने गळा घोटला असल्याचा आरोप या वकिलांनी केला आहे.
संजीव पुनाळेकर यांनी समाज हितासाठी अनेक जनहित याचिका, अनेक नवोदित वकिलांना दिशादर्शन, पीडित हिंदूंना न्यायालयीन सहाय्य केलेले आहे. मालेगाव स्फोटावेळी हिंदू आतंकवादाचा बुरखा फाडला आहे. असे वकील तसेच त्यांचे न्यायालयीन सहाय्यक विक्रम भावे यांना सीबीआयने ठोस पुरावे नसताना अटक केली आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
सीबीआयने या प्रकरणात अधिकारांचा दुरुपयोग केला आहे. पुनाळेकर यांना झालेल्या अटकेच्या विरोधात बार कौन्सिल ऑफ इंडिया, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा आणि केंद्रीय गृह मंत्रालय यांच्याकडे सीबीआयच्या विरोधात तक्रार करणार असल्याचेही या वकिलांनी सांगितले आहे.
कर्नाटक पोलिसांनी फसवून घेतलेल्या जबाबाच्या आधारावर थेट विरोधी पक्षाच्या वकीलाला अटक करणे केवळ चुकीचे नाही तर घटनाबाह्य आहे. यामुळे वकिलांचे नाईक स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. एखादा आरोपी वकिलाकडे अटकपूर्व जामीनसाठी कायदेशीर मदत मागतो. व्यवसायाचा एक भाग म्हणून वकील आरोपीचा अटकपूर्व जामीन दाखल करून जामीन मिळवून देतो. त्यासाठी वकिलाला आरोपीने पैसे दिले आहेत. वकील पत्र दिले आहे. म्हणजेच वकिल आणि आरोपी एकमेकाच्या संपर्कात आहे. असे म्हणत फरार आरोपी च्या तपासासाठी पोलीस वकिलाला पकडत नाही. मात्र, या घटनेत असेच घडले असल्याचे दिसून आले आहे. तसेच हे वकील आणि न्याययंत्रणा यांच्यासाठी धोकादायक असल्याचेही आघाडीचे वकील निलेश सांगोलकर म्हणाले.