पुणे: हरी नरके यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीच मोठे नुकसान झाल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. दरम्यान, नरके यांचा मृत्यू कसा झाला, काय झाला याबद्दल गैरसमज पसरवू नका, असे आवाहन यावेळी छगन भुजबळ यांनी केले. तर नरके यांच्या आठवणींना उजाळा देताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
काय म्हणाले छगन भुजबळ? यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मागच्या सप्टेंबरमध्ये आम्ही हरी नरके यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. त्यानंतर 4 ते 5 वेगवेगळ्या प्रकारच्या डॉक्टरांनी त्यांना तपासले आणि ते बरे देखील झाले. त्यानंतर काही दिवसांनी ते भोपाळमध्ये भाषण करायला गेले होते. तिथे त्यांचे वजन वाढले होते. तेव्हा तेथील काही डॉक्टर म्हणाले की, हरी नरके यांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण वाढले आहे. जाम नगरमध्ये ते गेल्यावर त्यांचे 5 किलो वजन घटले आणि 20 दिवसात त्यांचे 20 किलो वजन कमी झाले. त्यांनी तसे मला सांगितले देखील होते. मी त्यांना म्हणालो की, हरी बास झाले. आता तुम्ही परत या. आपण पुणे, मुंबईमध्ये जाऊन शहानिशा करू असे सांगत भुजबळांनी त्यांना दिलासा दिला.
भुजबळ यांना शंका: लेखक संजय सोनवणी यांनी जे सांगितले त्याबाबत भुजबळ म्हणाले की, सोनवणी यांना जो मेसेज केला तो आमच्याकडे पण आहे. ५० डॉक्टर त्यांना येऊन बघत होते आणि त्याला वर्ष झाले. त्यांच्या शरीराचे शव विच्छेदन झालेले नाही, यामागील कारण जाणून घ्यायला पाहिजे. १५ दिवस ते फक्त हॉस्पिटलमध्ये होते आणि ते स्वतः डॉक्टर होते. मी त्यावर जास्त बोलणार नाही. जामनगरमध्ये जाऊन २० किलो वजन घटले. तिथेच मला शंका आली की अशी कुठली औषधी दिली की ज्यामुळे २० दिवसात २० किलो वजन कमी झाले? असे देखील यावेळी भुजबळ म्हणाले. हरी नरके हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत म्हणून ओळखले जातात.