पुणे - कोरेगाव भिमा येथे 1 जानेवारी रोजी विजयस्तंभावर शौर्यदिन साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर-पुणे महामार्गावरील सर्व हॉटेल आणि दुकाने 24 तास सुरू राहणार आहेत. या हॉटेलांना पोलिसांमार्फत सुरक्षा पुरवली जाणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सई भोरे-पाटील यांनी दिली.
विजयस्तंभावर मानवंदना देण्यासाठी देशभरातून अनेक नागरिक कोरेगाव भिमा येथे दाखल होत आहेत. यावर्षी होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन येथे येणाऱ्या नागरिकांना जेवण पाणी, राहण्याची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी पुणे-नगर महामार्गावरील सर्व हॉटेल, दुकाने 24 तास सुरू ठेवावीत, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. तसेच या सर्व हॉटेलांना पोलिसांमार्फत सुरक्षा पुरवली जाणार आहे.
हेही वाचा - 'विखेंच्या वक्तव्याला महत्त्व देण्याची गरज नाही'
कोरेगाव भिमा येथे येणाऱ्या नागरिकांना स्थानिक, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून जेवण, पाणी, फळे पुरविण्यात येणार आहेत. यातून खाजगी हॉटेल, दुकानेही सुरु ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे या परिसरात येणाऱ्या लोकांना कुठल्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही, यासाठी योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू आहे.