पुणे - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याची प्रामाणिक अंमलबजावणी होत नाही. आपल्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासन व शासन दुर्लक्ष करत असल्याने किसान महासभेचे कार्यकर्ते किल्ले शिवनेरीवरून पायी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले आहेत. जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यातून किसान सभेच्या नेतृत्वाखाली हे कार्यकर्ते पायी जात आहेत. आज दुपारी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून पदयात्रा सुरू करण्यात आली आहे. या पदयात्रेचे नेतृत्व किसान महासभेने केले आहे.
हेही वाचा - पत्नी नांदत नसल्याने मित्राच्या मदतीने वडिलांनीच केले मुलाचे अपहरण
कोरोना महामारीच्या संकटकाळात आदिवासी भागांमध्ये हाताला काम नाही. खायला अन्न नाही. अशा संकटकाळात आदिवासी समाज असताना राज्य सरकारच्या माध्यमातून मनरेगाची योजना सुरू करण्यात आली. मात्र, ही योजना राबवत असताना शासकीय पातळीवर दिरंगाई केल्याने आदिवासी नागरिकांच्या हाताला काम मिळेना. त्यामुळे आपल्या हक्कांच्या मागण्यांसाठी किसान महासभेच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांचा पायी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला आहे.
या मोर्चामध्ये भीमाशंकर, घोडेगाव, मंचर, जुन्नर, शिरूर परिसरातील आदिवासी बांधव सहभागी झाले आहेत. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक होऊन निघालेली पदयात्रा शुक्रवारी 9 ऑक्टोबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. आज जुन्नर येथून निघालेला मोर्चा पुणे नाशिक महामार्गावरील मंचर येथे मुक्कामी असणार असून, उद्या सकाळी मोर्चात जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातील किसान महासभेचे सदस्य सहभागी होणार आहेत.
किसान सभेच्या प्रमुख मागण्या
गावातच रोजगार हमीची कामे मिळाली पाहिजे
कामाचा योग्य मोबदला द्यावा व कामाचा शेल्फ तयार करावा
काम मागूनही काम दिले नाही अशा मजुरांना बेरोजगार भत्ता मिळावा