पुणे - कळमशेत (ता.मुळशी ) येथील जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले आहे. मुळशी तालुक्यातील ही पहिली टॅबयुक्त शाळा होण्याचा मान कळमशेत जिल्हा परिषदेच्या शाळेला मिळाला आहे. यामुळे शाळेचे मुख्यध्यापक संजीव बागुल यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोरोनामुळे सध्या शाळाही बंद आहेत. शाळा सुरू न करता विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवणे सुरु आहे. मात्र, ग्रामीण भागात वीज नसणे तसेच पालक कामावर जाणे यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास करता येत नाही. पौडजवळ असणाऱ्या कळमशेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गरीब तसेच आदिवासी समाजाचे असे १५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांकडे चांगल्या दर्जाचे फोन नाहीत. त्यामुळे सर्व विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेऊ शकत नाही. याची दखल घेऊन येथील मुख्यध्यापक संजीव बागूल यांनी पुणे येथील इंस्ट्यूड फॉर ह्यूमन इंटरप्रेन्योर डेव्हल्पमेंट या संस्थेकडून मदत म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाईन घरच्या घरी सर्व विषयांचा अभ्यास करता यावा म्हणून टॅब उपलब्ध करून दिले आहेत.