पुणे : पोलीस खात्यात 2020 मध्ये 650 पदांची भरती निघाली होती. ही जाहिरात पीएसआय, एसटीआय या पदांसाठी होती. 19 जुलै रोजी पीएसआयच्या 585 पदांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. 65 पदांचा 'ईडब्ल्यूएस' उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे; परंतु यामध्ये न्यायालयीन कारण दाखवून आम्हाला नोकरीमध्ये घेतले जात नाही, असा आरोप या उमेदवारांनी केलेला आहे. यासंदर्भात निकाल दिलेला असून पूर्वलक्षी प्रभावाने कुठलाही निर्णय लागू होत नाही असे म्हटलेले आहे. सरकार या सगळ्यांमध्ये तांत्रिक बाबी सांगून आमची अडवणूक करत असून आमचे वर्ष वाया घालवत असल्याचा आरोप या पात्र उमेदवारांनी केलेला आहे.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्वरित नियुक्त्या द्या : यासंदर्भात उमेदवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनासुद्धा निवेदन दिलेले आहे. अधिवेशनामध्ये रोहित पवार यांनीसुद्धा या प्रश्नावर आवाज उठवलेला आहे; परंतु सरकार आम्हाला न्यायालयाच्या निर्णय प्रक्रियेत अडकवून आमच्यावर अन्याय करत असल्याचे या उमेदवारांनी म्हटले आहे. जर आम्हाला तुम्ही लवकर नियुक्त्या नाही दिल्या किंवा प्रक्रिया सुरू नाही केली तर पुण्यातील विधानभवनासमोर आंदोलनाला बसू असा इशाराही त्यांनी दिलेला आहे.
अभ्यास आणि वर्ष वाया जाईल : उमेदवारांनी चार ते पाच वर्षे या परीक्षेसाठी कसून सर्वच विषयांचा अभ्यास केला. आता तो अभ्यास वाया जाईल. त्याचबरोबर आणखी दोन ते अडीच वर्षेही वाया जातील. त्यामुळे आमचा गांभीर्याने विचार करावा एवढीच आमची मागणी आहे. अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असे उमेदवारांनी म्हटलेले आहे.
एकाला न्याय दुसऱ्यावर अन्याय : एकाचवेळी जर 650 विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जात असतील. त्यातल्या 585 लोकांना जर नोकरीवर घेतले जात असेल तर हा एकाला न्याय आणि दुसऱ्यावर अन्याय आहे. सरकारचे काम आहे ते सरकारने करावे. हीच कळकळीची मागणीही उमेदवारांनी केलेली आहे. आता प्रशासन उमेदवारांच्या मागण्या कितपत मान्य करतात, हे बघणे औचित्याचे ठरेल. जर लवकर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलनाची तयारी या उमेदवारांनी केली आहे.