बारामती - बारामती शहरातील खत्री पार्क व वसंतनगर येथील घरफोडी करून चोरी गेलेला मुद्देमाल शहर पोलिसांनी तक्रारदारांना आज परत केला. संतोष दत्तात्रय कुलकर्णी (वय 45) यांच्या खत्री पार्क मधील बंगल्याचे दाराचा कडीकोयंडा तोडून 65 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच संतोष म्हसु गायकवाड (वय 52) यांचे वसंत नगर येथील घरातून 64 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होती.
सदर घरफोडी प्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी पोलिसांना शोध घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे व त्यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, गुन्हे शोध पथकाचे दादा डोईफोडे, ओंकार सिताप, सुहास लाटणे, अविनाश दराडे, दशरथ इंगोले, योगेश कुलकर्णी, तुषार चव्हाण, अकबर शेख, अतुल जाधव यांनी ही कारवाई केली.
तक्रारदारांना दागिने परत केले-
समांतर तपास करून वरील दोन्ही गुन्हयातील आरोपी बेरडया उर्फ नियोजन संदिप भोसले (२८वर्ष रा.सोनगाव ता.बारामती जि.पुणे) यास अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तो आज तक्रारदारांना यांना परत करण्यात आला. चोरीस गेलेला सोन्याचे दागिने परत मिळतील. असे कधीही वाटले नव्हते. परंतु आमचे चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जशाचे तसे परत मिळाल्याने खुप आनंद झाला असल्याचे तक्रारदाराने म्हटले असून त्यांनी पोलीस दलाचे अभार मानले आहेत.
हेही वाचा- विधानसभा अध्यक्ष दिल्लीतून ठरवला जाईल - अस्लम शेख