पुणे - गेल्या वर्षभरापासून राज्यावरील कोरोनाचे संकट वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी राज्य सरकार विविध उपाय योजना करत आहे. मात्र, दुसरीकडे खासगी रुग्णालय रुग्णांकडून जास्त पैसे आकारत असल्याचे प्रकार राज्यात विविध ठिकाणी घडत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांना बेड, ऑक्सिजन व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर मेडिसीन मोफत दिले पाहिजे. तसेच राज्यातील खासगी रुग्णालयावर नियंत्रण आणून लोकांना मोफत उपचार मिळाले पाहिजेत, कोरोनाच्या लस निर्मितीसाठी राज्य सरकारने हिंदुस्तान अँटिबायोटिक कंपनीची पुन्हा सुरुवात केली पाहिजे, या मागण्यांसाठी भारतीय दलित कोब्राचे ॲड. भाई विवेक चव्हाण यांनी आजपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली.
नागरिकांच्या आरोग्यासाठी तातडीने निर्णय घ्यावे -
राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेचाही सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. या दुसऱ्या लाटेमुळे भयावह परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. असे असताना पुन्हा तिसऱ्या लाटे येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी तातडीने योग्य ते निर्णय घ्यावे आणि नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्य व्यवस्था कश्या पद्धतीने मिळेल, याचाही विचार करावा, असे मत यावेळी ॲड. भाई विवेक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.
नागरिकांना मोफत उपचार मिळाले पाहिजे -
गेल्या दीड वर्षांपासून काही काळ सोडले, तर सर्वांचेच उद्योगधंदे बंद पडले आहे. अनेकांचे रोजगारदेखील या कोरोना महामारीमुळे गेले आहे. नागरिकांकडे जे काही होते, ते आत्ता पूर्णपणे संपले आहे. असे असताना रुग्णालयांकडून लाखो रुपयांचे बील कोरोना रुग्णांना दिले जात आहे. हे अत्यंत चुकीचे असून लोकांना मोफत उपचार मिळाले पाहिजे, अशी मागणीदेखील यावेळी करण्यात आले.
हेही वाचा - VIDEO : ...अन्यथा या देशात केवळ मुडद्यांचं राज्य राहील - संजय राऊत