पुणे : मोहम्मद शरीफ शेख यांनी 50 वर्षांहून अधिक काळापासून झेंडे बनविण्याचे काम सुरू केले आणि पाहता-पाहता हे झेंडा बनविण्याचे काम आज त्यांच्या चौथ्या पिढीपर्यंत येऊन पोहचले आहे. शेख कुटुंबातील सर्वचजण पुरुष मंडळी तसेच महिला, सून हे देखील आज तिरंगा बनवण्याचे काम करत आहे. ही मंडळी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या चार महिन्यांपूर्वीपासून तयारी करतात. ( independence day )
देशसेवा म्हणून बनवतात तिरंगा : तिरंगा बनविणे हा शेख कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय आहे. राजेंद्र नगरमधील दत्त मंदिराजवळ शेख कुटुंब गेल्या काही वर्षांपासून राहत आहे. या कुटुंबातील पुरुष हे लग्न किंवा पार्ट्यांमध्ये डेकोरेशनचे काम करतात; पण ऑगस्ट व जानेवारीत मात्र ही मंडळी घरच्यांबरोबर झेंडे तयार करण्याच्या कामात गढून जातात. शहरातील सर्व किरकोळ विक्रेते यांच्याकडूनच झेंडे नेतात. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी शहरभर चक्क लाखभर झेंडे शेख कुटुंबीयांकडून पुरवले जातात. आमच्या सासऱ्यांनी या कामाला सुरुवात केली. हे काम आताही सुरूच आहे. पुरुषांसोबतच सर्व महिला आणि लहान मुले मिळून हा तिरंगा बनविण्याचे काम करतात. हे काम व्यवसाय म्हणून नव्हे तर देशसेवा म्हणून करत असल्याचे इलियास शेख सांगतात.
मला या घरची सून होऊन 3 ते 4 वर्षे झाली आहेत; पण मी देखील घरच्यांचे बघून-बघून शिकत गेले आणि आज अभिमानाने तिरंगा बनवत आहे. अल्लाची इबादत म्हणून जसे नमाज पढत असतो तसे देशाप्रती प्रेम म्हणून आम्ही तिरंगा बनवत असतो. - ऐमन शेख, सून
यंदा 20 हजारहून अधिक तिरंग्यांची निर्मिती : नेहमीच 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या आधी 4 ते 5 महिन्यांपूर्वी आम्ही झेंडे बनविण्याचे काम सुरू करतो. दिवसाला पाच हजार झेंडे सहज बनवतो. सर्व पुणे शहरात आम्ही बनविलेले झेंडे लावले जातात. सध्या महागाई वाढल्याने यंदा फक्त 15 ते 20 हजार झेंडेच बनविले आहेत. आम्ही दरवर्षी 40 ते 50 हजार झेंडे बनवतो, असे यावेळी इलियास शेख यांनी सांगितले.
असे बनवितात झेंडे : झेंडे बनवताना मंडईतून बांबूच्या काड्या, तिरंगी ताग, जिलेटीन पेपर, भिरभिऱ्यासाठी तारा अशा वस्तू आणतात. बांबूच्या काड्यांना डिंक लावणे, तिरंगा पेपर चिकटवणे, मग तारांच्या तुकड्यांनी जिलेटीन कागदाचे चक्र लावणे असे हे काम सलग सुरू असते. कच्च्या मालाची नासधूस होऊन चालत नाही. विशेषत: डिंक, कागदाचे ताग, जिलेटीन पेपर्स जपावे लागतात. हे काम किचकट असले तरी आता आम्हाला सवय झाली असल्याने आम्ही पटापट झेंडे बनवतो, असेदेखील यावेळी इलियास शेख म्हणाल्या.
महागाईचा फटका : सध्या महागाई वाढल्याने सर्वच गोष्टी या महाग झाल्या आहेत. झेंडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य देखील महाग झाले आहे. त्यात शेख कुटुंबीयांना एक झेंडा बनविण्यासाठी किमान 2 ते अडीच रुपये खर्च येतो आणि तो झेंडा 3 ते 4 रुपयांमध्ये होलसेल विक्रेत्याला विकतात. विकताना एक झेंडा नव्हे तर ते शेकड्यांच्या हिशोबाने किरकोळ व्यापाऱ्यांना विकतात. मग हाच झेंडा होलसेल विक्रेता बाजारात 10 ते 15 रुपयांना विकतो. यात आम्हाला जास्त नफा मिळत नाही; पण पिढीजात काम आणि देशाप्रती असलेले प्रेम म्हणून आम्ही झेंडे बनवत आहे, असे देखील यावेळी शेख कुटुंबीय सांगतात.
हेही वाचा: