बारामती - कारखाना निवडणूकीत ब वर्ग सभासदासाठी सोसायटीने अध्यक्षांच्या नावाचा ठराव केलेला असताना बनावट ठराव दाखल करत फसवणूक केल्याप्रकरणी रामचंद्र विठ्ठल भोसले (रा. तरडोली, ता. बारामती) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा निंबाळकर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तरडोली येथील हनुमान वि. कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप संभाजी धायगुडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
फसवणूक केल्याप्रकरणी भोसले यांच्यावर गुन्हा दाखल -
18 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी हे सन 2017पासून सोसायटीचे अध्यक्ष आहेत. या संस्थेकडून सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणूकीसाठी ब वर्ग सभासद प्रतिनिधी म्हणून फिर्यादीच्या नावचा ठराव संमत करत तो कारखान्याकडे पाठविण्यात आला होता. मात्र, 14 जानेवारी 2020ला प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये फिर्यादीला नाव दिसले नाही. त्यामुळे त्यांनी कारखान्याकडे चौकशी केली असता संस्थेतर्फे तुमचा ठराव मुदतीत आला नसल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्या यादीत ही जागा रिक्त ठेवण्यात आली होती. त्यावेळी रामचंद्र विठ्ठल भोसले यांचे नाव यादीत समाविष्ट झाले. तुम्ही जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांच्याकडे जावून चौकशी करा, असे कारखान्याकडून फिर्यादीला सांगण्यात आले. फिर्यादीने याबाबत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात जावून चौकशी केली असता 26 डिसेंबर 2019 रोजीच्या पत्रानुसार भोसले यांचे नाव समाविष्ट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे भोसले यांनी बनावट सही-शिक्क्यांचा वापर करत स्वतःच्या नावचा ठराव झाल्याचे भासवत खोटी कागदपत्रे तयार केल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यामुळे फिर्यादीचा मतदानाचा हक्क हिरावून घेत संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी भोसले यांच्यावर गुन्हा दाखल झाला.