पुणे : पिंपरी- चिंचवड शहरातील विविध तीन ठिकाणी अज्ञातांनी हवेत गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. पत्राशेड झोपडपट्टी परिसर, पिंपरी भाट नगर आणि बौद्ध नगर येथे हा गोळीबार करण्यात आला आहे. तिन्ही ठिकाणी मिळून एकूण आठ गोळ्या पिस्तूलातून झाडण्यात आल्या आहेत. अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. रिक्षातून उतरून पिस्तुल काढताना अज्ञात आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
हवेत गोळीबार केला : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेपाच च्या सुमारास अज्ञात तीन आरोपींनी रिक्षातून येथून पत्राशेड येथील किराणा दुकानदाराला दमदाटी केली त्याच्या कानशिलात लगावली. त्याच्या काउंटर वर पिस्तुल ठेवून त्याला दम देण्यात आला आणि सीसीटीव्ही बंद करण्यास सांगितला. तिथल्या काही नागरिकांना दमदाटी करण्यात आली पैकी एकाने पिस्तूलातून हवेत गोळ्या झाडण्यात आल्या. तसेच पुढे जाऊन पिंपरी भाट नगर आणि बौद्ध नगर या परिसरात देखील हवेत गोळीबार केला आहे. तिन्ही घटनांमध्ये एकूण आठ गोळ्या पिस्तूलातून झाडल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पिंपरी- चिंचवड पोलीस दाखल झाले असून तपासासाठी पाच पथक तयार करण्यात आली आहेत.