पुणे- भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात अनेक ज्ञात अज्ञात वीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु या महान सुपुत्रांचे बलिदान कायम स्मरणात रहावे यासाठी 23 मार्चला शहीद दिवस पाळला जातो. शहीद राजगुरु हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या राजगुरूनगर येथील रहिवासी. राजगुरूंच्या या वाड्याचे स्मारक करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी ९५ लाख रुपये खर्च करुन सागवानी लाकडात काम केले गेले. मात्र, आता त्या कामाच्या दर्जावरच प्रश्न उपस्थित होत आहे.
निधीची तरतूद मात्र काम नाही
देशाला परकीय जोखंडातून मुक्त करण्यासाठी हसत हसत फासावर जाणारे पराक्रमी हुतात्मा शिवराम हरि राजगुरु यांचा 23 मार्चला बलीदान तर 24 ऑगस्टला जन्मदिवस असतो. त्यांच्या जन्मगावी राजगुरुनगर येथे राजगुरुवाड्यावर हे दोन्ही दिवस त्यांच्या स्मृतीत पाळले जातात. राजगुरूनगरच्या भीमा नदी तीरावर क्रांतीकारक हुतात्मा शिवराम हरि राजगुरु यांचा वाडा आहे. याच वाड्यात हुतात्मा राजगुरुंचे बालपण गेले, देशासाठी बलिदान दिलेल्या या हुतात्म्याच्या याच वाड्याला मोठा इतिहास असून इथे येणा-या प्रत्येकाला या वाड्यातून जाज्वल्य देशभक्तीची प्रेरणा मिळत असते. मात्र, अशा या थोर क्रांतीकारकाचे जन्मस्थळ असलेल्या या स्मारकाच्या उभारणीकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त होत आहे. हुतात्मा राजगुरुंचा जन्मवाडा अजुनही दुर्लक्षीतच आहे याठिकाणी हुतात्मा राजगुरुंचे स्मारक कधी होणार. स्मारकासाठी निधीची तरतुद होते पण काम मात्र नाही.
हेही वाचा- शरद पवारांचा अनिल देशमुखांना पाठीशी घालण्याचा डाव फसला - देवेंद्र फडणवीस
स्मारक निधीत आर्थिक गडबड
राजगुरूंच्या या वाड्याचे स्मारक करण्यासाठी तीन वर्षापूर्वी ९५ लाख रुपये खर्च करुन सागवानी लाकडात काम केले गेले. मात्र, आता त्या कामाच्या दर्जावरच प्रश्न उपस्थित होतोय. या वाड्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी झाल्या त्यानंतर संपूर्ण स्मारक तयार करण्याचा आराखडा तयार झाला. त्यासाठी अर्थसंकल्पात कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आजूबाजूला नागरिकांनी आपली जागा स्मारकासाठी देण्याची तयारी दाखवली पण सरकार पातळीवर असलेल्या उदासीनतेमुळे अजूनही स्मारकाचे काम पूर्ण करु शकले नाही. उत्कृष्ठ बांधकामाऐवजी हे स्मारक निधीत झालेली आर्थिक गडबड व निकृष्ट बांधकामामुळेच चर्चेत राहिलेले आहे.
हेही वाचा- शहीद दिन : फिरोजशाह कोटलातील बैठक ते असेंब्लीतील बॉम्बस्फोटाची गोष्ट