बारामती- गेल्या चार ते पाच दिवसांपासून बारामती शहर व तालुक्यातील कोरोना संक्रमित रुग्णांची दैनंदिन आकडेवारी ५० च्या घरात पोहोचली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता होम क्वारंटाईन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती सिल्वर जुबली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी दिली. तसेच शनिवारी तहसीलदार विजय पाटील यांच्या उपस्थितीमध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या बैठकीमध्ये तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर देखील बैठकीमध्ये चर्चा झाली.
दोन कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एकाही रुग्णाला होम आयसोलेशनमध्ये राहता येणार नाही. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये नोंद केल्याशिवाय अथवा वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या शिफारस पत्राशिवाय कोणत्याही खासगी रुग्णालयाला कोविड रुग्ण ऍडमिट करून घेता येणार नाही. तसेच वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे एक कोविड केअर सेंटर सुरू असून, नटराज नाट्य कला मंडळ यांच्यामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथील वस्तीगृहात दोन कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत.
प्राथमिक रुग्णालयात कोविड लसीकरण करण्यात येणार
८ मार्च २०२१ पासून सोमवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी सर्व ग्रामीण प्राथमिक रुग्णालयात कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. महिला हॉस्पिटल, बारामती व ग्रामीण रुग्णालय, सुपे येथे सोमवार ते शनिवार या दिवशी लसीकरण करण्यात येणार आहे. सदरचे लसीकरण हे विनामूल्य आहे. या लसीकरणासाठी प्रथम ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले असून, त्यानंतर ४५ ते ६० दरम्यान वय असलेल्या नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे. तर खासगी हॉस्पिटलमध्ये ही लस घ्यावयाची असल्यास त्यासाठी २५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. ही लस सुरक्षित असून नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावे असे आव्हान डॉ. मनोज खोमणे यांनी केले आहे.