पुणे - मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुण्यासह राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत गेली. त्यानंतर सुरुवातीला पुण्यात आणि नंतर राज्यात कडक निर्बंध जाहीर करण्यात आले. सकाळी 7 ते 11 यावेळेतच अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आता शहरासह राज्यात कोरोना रुग्णात वाढ कमी झाली आहे. म्हणून राज्य सरकारने 1 जूनपासून आम्हाला दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी घ्यावी, अशी मागणी व्यापारी महासंघाच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणी संदर्भातील पत्रदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले आहे.
सरकारने आमचा विचार करावा -
राज्यात 5 एप्रिलपासून सुरू झालेल्या निर्बंधांमुळे पुण्यातील व्यापारी आर्थिक अडचणीत सापडले आहे. गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, ईद अशा महत्त्वाच्या सणाच्या वेळेत लॉकडाऊन असल्याने पुण्यातील व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासून व्यापाऱ्यांनी सरकारला सहकार्य केले आहे. ते या पुढेही करण्यात येणार आहे. मात्र, आता रुग्णसंख्या कमी झाल्याने सरकारने आमचा विचार करावा आणि आम्हाला दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी केली आहे.
हेही वाचा - 'कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी राज्यात टास्क फोर्सची निर्मिती करणारे देशातील पहिले राज्य'
सिरमकडून लस खरेदी करून लसीकरण करण्यासाठी तयार -
आम्ही सर्व व्यापारी, आमचे कुटुंबीय, कामगार वर्ग आणि त्याचे कुटुंबीय लसीकरण करण्यासाठी तयार आहोत. जवळजवळ 30 हजार लोकांनी आमच्याकडे नाव नोंदवली आहेत. लसीकरणाबाबत आमचे नियोजनही सुरू आहे. मात्र, एकंदरच लसीचा तुटवडा लक्षात घेत आम्ही स्वतः सिरम इन्स्टिट्यूटला पत्र पाठवले आहे. आम्ही त्यांच्याकडून लस खरेदी करून आमच्या 14 ते 44 वर्षीय कामगार आणि कुटुंबीयांना लस देण्यासाठी देखील तयार आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा - दिलासा.. राज्यात ऑक्सिजनची मागणी घटली.. कोरोनाची दुसरी लाट ओसरणीला!