राजगुरुनगर (पुणे) - पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगरजवळ चांडोली फाटा येथे महामार्गालगत असणाऱ्या हॉटेलमध्ये आज पहाटेच्या सुमारास गॅस सिलेंडर स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली. राजगुरुनगर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने दोन तासांत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, बाजूला असणारी दोन दुकानेही या आगीत जळून खाक झाली. यामध्ये हॉटेलसह दोन दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा - मुंबई : वडाळ्यात पहाटे गॅस सिलिंडरचा स्फोट, आग नियंत्रणात
आगीवर नियंत्रण
पुणे-नाशिक महामार्गावर दिवस-रात्र वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे पहाटेपासून महामार्गावर छोटी-मोठी हॉटेल सुरू होत असतात. आज पहाटेच्या सुमारास पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या चांडोली फाटा येथील हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट होऊन आगी लागली. काही क्षणांतच आगीची तीव्रता वाढत संपूर्ण हॉटेलसह बाजूची दोन दुकानेही आगीत जळून खाक झाली. सुदैवाने, कुठलीही जीवितहानी झाली नाही.
प्रशासनाचे दुर्लक्ष
महामार्गालगत पत्र्याच्या शेडमध्ये अनेक दुकाने, हॉटेल उभी रहात आहेत. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कुठल्याच उपाययोजना केल्या जात नसल्याने अशा दुर्घटनाकाळात आपात्कालीन मदत मिळणे कठीण होते. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याकडे प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे चित्रही पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - भिमाशंकर रोडवर ट्रॅक्टरचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, एक जण जखमी