पुणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने व सेवा उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यावर्षी मानाच्या गणपती मंडळांच्या गणपतींची प्रतिष्ठापना इतर मानाच्या गणेश मंडळांचे अध्यक्ष-पदाधिकारी यांच्या शुभहस्ते पार पाडली.
मानाचा पहिला श्री. कसबा गणपती मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख हेमंत रासने यांच्या शुभहस्ते पार पडली, तर मानाचा दुसरा श्री. तांबडी जोगेश्वरी गणपतीची प्रतिष्ठापना मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्या हस्ते, तसेच श्री. गुरूजी तालीम मंडळाची प्रतिष्ठापना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सव प्रमुख पुनित बालन यांच्या शुभहस्ते आणि मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपतीची प्रतिष्ठापना केसरी वाडा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिपक टिळक यांच्या हस्ते पार पडली. तसेच, मानाचा पाचवा गणपती केसरी गणेशोत्सवाच्या ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना मंडळाचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक व डॉ. प्रणती रोहित टिळक यांच्या हस्ते झाली.
यंदा कोरोनाच्या पाश्ववभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकीला परवानगी देण्यात आली नव्हती. याच पार्श्वभूमीवर यंदा मानाच्या पाचही गणपती मंडळांनी साध्या पद्धतीने श्रींचे आगमन केले. यंदा कोरोनामुळे सर्व मंडळे गणेश दर्शन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमे ऑनलाइन करणार आहेत. पुणेकरांनी कोरोनाच्या या काळात घरीच बसून बाप्पाचे दर्शन घ्यावे. कोणीही बाहेर पडू नये, जेणेकरून आपल्यामुळे इतरांना कोणताही त्रास होणार नाही. आणि गणेशोत्सवाला कोणतीही गालबोट लागू नये, म्हणून यंदा सर्व मानाच्या गणेश मंडळांनी ऑनलाइन कार्यक्रम घेण्याचे ठरवले आहे, असे मानाचा पहिला गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी सांगितले.
तसेच, गेल्या १२८ वर्षात प्रथमच मानाच्या गणपती मंडळांनी गणेश मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी यांच्या शुभहस्ते प्रतिष्ठापना केली आहे. अत्यंत साधेपणाने पण उत्साहामध्ये परंपरा न मोडता चांदीच्या पालखीतच गजाननाचे आगमन केले आहे. भावना संमिश्र आहे, वाईटही वाटत आहे, पण यंदाचे गणेशोत्सव हा सेवा उत्सव म्हणून साजरा करणार आहोत, अशी भावना देखील श्रीकांत शेटे यांनी व्यक्त केली.
प्रशासनाने सांगितल्या प्रमाणेच यंदा आम्ही साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहोत. दरवर्षी वाजत गाजत गणरायाचे आगमन करत असतो. पण यंदा मंदिरातून मांडवात गणपती बाप्पाला आणून त्यांचे आगमन केले आहे. खूप वाईट वाटत आहे, पण पुणेकरांच्या हितासाठी निर्णय घेतला आहे, अशी भावना मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांनी व्यक्त केली.
प्रत्येकाच्या अंगातला उत्साह वाढवणारा हा उत्सव असतो, आणि तोच यावर्षी हरपला आहे, अशी भावना मानाचा चौथा तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर यांनी व्यक्त केली आहे. यापुढील काळात विघ्नहर्त सगळीच विघ्न दूर करेल, अशी प्रार्थना गणराया चरणी मानाच्या पाचव्या श्री. केसरी वाडा गणपती मंडळाचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी गणराया चरणी केली आहे.
'या' मंडळांनी मंडपात गणपती प्रतिष्ठापना करण्याचा घेतला होता निर्णय
यात, मानाचा पहिला कसबा गणपती, दुसरा तांबडी जोगश्वरी, तीसरा गुरुजी तालीम गणपती आणि चौथा तुळशीबाग गणपतीचा समावेश आहे. या चारही गणपतींना मंडपात बसवण्याचा निर्णय या गणपती मंडळांच्या अध्यक्षांनी घेतला होता. गणेशोत्सव काळात जे काही विधी होणार आहेत, त्या सर्व विधी या मंडपाच्या आतच केल्या जातील, असे पाचही मंडळांकडून स्पष्ट करण्यात आले होते.
हेही वाचा- गणरायाचे अप्रतिम मोझॅक पोट्रेट; ३६ हजार कागदी फुलांचा वापर