बारामती (पुणे) - कर्जत-जामखेड भागात जेथे-जेथे राष्ट्रवादीची सत्ता येऊ शकली नाही, त्या भागातील ग्रामपंचायतींच्या विकासासाठी शासनाकडून आवश्यक तो निधी प्रामाणिकपणे आणला जाईल. कारण शेवटी ते माझे लोक आहेत, अशी भावना आमदार रोहित पवार यांनी बारामतीत व्यक्त केली.
मुंडे विरोधात राजकीय हेतूने आंदोलन -
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपाबाबत भाजपच्यावतीने आंदोलने केले जात आहेत. याबाबत विचारले असता ते म्हणाले की, मुंडेंवर आरोप झाल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी जाहीरपणे व्यक्त झाले आहेत. एखादा माणूस ज्यावेळेस व्यक्त होतो, तेव्हा त्याच्या मनामध्ये खोट नसते. पोलीस प्रशासन त्याबाबत योग्य लक्ष ठेवून आहे. एडीआर रिपोर्ट प्रत्येक आमदार खासदारांसाठी काढला जातो. आज देशभरात आपण बघितले तर सर्वात जास्त भाजपाच्या आमदार खासदार यांच्याविरोधात महिलांबाबतचे आरोप आहेत. मुंडेंबाबत भाजप करत असलेले हे आंदोलन राजकीय हेतूने होत आहे.
अर्णब गोस्वामीविरोधात आंदोलन करण्याची गरज -
भाजपाने खरेतर अर्णब गोस्वामीविरोधात आंदोलन करण्याची गरज आहे. महाराष्ट्र भाजपाने केंद्राला पत्र लिहून गोस्वामी विरोधात कारवाई करण्याची मागणी केली पाहिजे. देशाने बालाकोटवर केलेल्या हल्ल्याची गोस्वामीला तीन दिवस अगोदरच माहिती होती. एवढी मोठी गोपनीय माहिती भाजपाची बाजू घेणाऱ्या पत्रकाराला मिळणे, ही गंभीर बाब आहे. त्यामुळे मुंडेंऐवजी भाजपाने गोस्वामी विरोधात आंदोलन करण्याची गरज आहे, असे पवार म्हणाले.
हेही वाचा - जलसंपदा मंत्र्यांच्या सासुरवाडीत राष्ट्रवादीचा उडाला धुरळा, भाजपने रोवला झेंडा