बारामती - मोक्का गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपीला बारामती शहर पोलिसांनी सातारा जिल्ह्यात अटक केली आहे. गणेश संजय बोडरे (रा. सातव वस्ती, ता. बारामती) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बारामती शहर पोलीस ठाण्यात मोक्का गुन्ह्यात गणेश बोडरे व त्याचा जोडीदार नितीन तांंबे हे फरार होते. दरम्यान, त्यांना तत्काळ अटक करण्याचे लेखी आदेश पोलिसांना मिळाले होते.
पुढील कारवाई बारामती शहर पोलिसांकडे
फरार आरोपी गणेश बोडरे हा (पुसे सावळी, ता. माण, जि. सातारा) परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस नाईक रुपेश साळुंखे यांना मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून बोडरे यास पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील कारवाई बारामती शहर पोलीस करत आहेत. या तपासात पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, सहाय्यक फौजदार शिवाजी निकम, पोलीस नाईक रुपेश साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार चव्हाण, अकबर शेख, सुभाष लाटणे, अतुल जाधव, दशरथ इंगोले, अजित राऊत, अंकुश दळवी यांचा सहभाग आहे.