बारामती - पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे यांच्यावर दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातानी गोळीबार केला होता. या घटनेत तावरे यांच्या छातीत एक गोळी लागून ते जखमी झाले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी रोहिणी रविराज तावरे यांनी रात्री उशिरा तक्रार दिली. याप्रकरणी प्रशांत मोरे, विनोद उर्फ टॉम मोरे, राहुल उर्फ रिबल यादव यांच्यासह एका अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून आरोपींवर कलम ३०७. १२०ब, ५०४, ५०६, ३४ आर्म अॅक्ट ३(२५),(२७) कलमान्वये गुन्हा बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या दारी! गिरीश महाजनही होते उपस्थित
चार जणांना अटक
तक्रारदार या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य असून, त्यांनी केलेल्या विकासकामांचा रोष मनात धरून तसेच तक्रारदार यांच्या कार्यकर्त्यांना वारंवार धमकावण्याचा प्रयत्न करून राजकीय व अधिक फायदा मिळवण्याच्या हेतूने तक्रारदाराचे पती रविराज तावरे यांना संपवून दहशत निर्माण करण्याच्या हेतूने कट रचून तावरे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी तत्काळ घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले. वरिष्ठांनी तपासकामी वेगवेगळी पथके बनवून तपास सुरू केला. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली असता उरळीकांचन येथून एका अल्पवयीन मुलासह राहुल उर्फ रिबल यादव याला ताब्यात घेतले. तसेच तक्रारदाराने दिलेल्या माहितीवरून आरोपी प्रशांत मोरे यास स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी ताब्यात घेतले. अवघ्या पाच तासात चारही आरोपींना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले.
या पोलीस अधिकाऱ्यांनी केली कारवाई -
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, बारामती उपविभाग बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोसई नितीन मोहीते, राहुल पांढरे, नंदु जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, नितीन चव्हाण, दिपक दराडे, निखिल जाधव यांनी केली.
हेही वाचा - सुशांतसिंग ड्रग्ज प्रकरण : मुंबईतील न्यायालयाकडून सिद्धार्थ पिठानीच्या एनसीबी कोठडीत 4 जूनपर्यंत वाढ