पिंपरी-चिंचवड (पुणे) - शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे आज पिंपरी-चिंचवड येथे निधन (Gajanan Babar Passes Away) झाले. ते 79 वर्षांचे होते. त्यांना मागच्या काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज दुपारी त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीय व्यक्तींनी दिली आहे.
- अचानक तब्येत बिघडली -
मागील काही दिवसांपासून गजानन बाबर हे प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त होते. त्यांना पोटविकार होता. नुकतेच त्यांना पोटावरील उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांमुळे त्यांच्या प्रकृतीत मागील आठवड्यात सुधारणाही झाली होती. महत्त्वाचे म्हणजे 26 जानेवारी रोजी झालेल्या बँकेतील ध्वजारोहनासही ते उपस्थित राहिले होते. मात्र, बुधवारी पुन्हा एकदा त्यांची तब्येत अचानक बिघडली. गजानन बाबर यांना प्रकृती बिघडल्याने बुधवारी पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर पिंपरी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
- असा होता त्याचा राजकीय प्रवास -
गजानन बाबर यांनी 90 च्या दशकात राजकारणात पाय रोवला. त्यांनी त्यांची वेगळी ओळख निर्माण केली. मावळ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये घरा घरात शिवसेना पोहचवण्याच काम त्यांनी केले होते. दरम्यान, 2009 ते 2014 दरम्यान त्यांनी मावळ लोकसभा खासदार म्हणून काम पाहिले, तर, 1999 ते 2004 आणि 1995 ते 1999 या दरम्यान त्यांना आमदार म्हणून बहुमताने निवडून दिले होते. तर सलग तीन वेळा ते नगरसेवक झाले होते. त्याशिवाय, 1992-93 ला ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते होते. बाबर यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत अनेक बहुउपयोगी काम केली आहेत. त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.
चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी माजी खासदार गजानन बाबर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उषा उर्फ माई ढोरे यांनी त्यांना ट्वीट करून श्रद्धांजली वाहिली आहे.
हेही वाचा - गोव्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 24 स्टार प्रचारकांची यादी जाहीर