पुणे - आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी येथील महेंद्र दामोदर पोखरकर या शेतकऱ्याच्या विहिरीत बिबट्या पडल्याची घटना मध्यरात्री घडली. सकाळच्या सुमारास स्थानिक नागरिकांच्या मदतीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला सुखरुप बाहेर काढले. बिबट्याला प्राथमिक उपचारासाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या शिकारीच्या शोधात पिंपळगाव खडकी येथे शिकारीच्या मागे धावत असताना अचानक पोखरकर यांच्या विहिरीत पडल्याची घटना घडली होती. हा बिबट्या नर जातीचा असून अंदाजे अडीच ते तीन वर्षाचा असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. सध्या बिबट्याची सुखरुप सुटका करण्यात आली असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन त्याला पुन्हा सोडण्यात येणार आहे.
मागील अनेक दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्या सतत शेतात, मानवी वस्तीत शिरून पाळीव प्राण्यावर हल्ले करत करत आहेत. तर काही ठिकाणी बिबट्यांचे अपघात होत आहे. त्यामुळे बिबट्याच्या संगोपनाचा प्रश्न ऐरणीवर आल्याने बिबट आता लोकवस्तीत येऊन पाळीव प्राण्यावर हल्ले करत आहे.