पिंपरी-चिंचवड - जुना पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी भक्ती शक्ती चौकात उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. त्याच्या एक लेनचे उदघाटन पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रथम नागरिक महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पार पडले आहे. दरम्यान, त्यांच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि इतर कार्यकर्त्यांनी बुधवारी उदघाटनाचा कार्यक्रम पार पाडला होता. त्यामुळे एकाच पुलाचे दोनदा उद्घाटन झाल्याच पाहायला मिळालं. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार महेश लांडगे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, महानगर पालिकेचे अधिकारी यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
वाहतूक सुरळीत व अधिक सुरक्षित होण्यासाठी महापालिकेने चौकात उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटर, रोटरी रस्ता बांधण्याची काम सुरू आहे. भक्ती शक्ती चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. मात्र, वाहतूक कोंडी आणि वाहनचालकांना मोठा वळसा घेऊन जावा लागत असल्याने एका लेनचे उदघाटन पार पडले आहे.
वाहन चालकांना मोठा वळसा मारून जावा लागत असल्याने पुलाच्या एका लेनचे उदघाटन कऱण्यात आले आहे. या महामार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. मार्गावरील वाहनांना मोठा वळसा घालून जावे लागत असल्याने जुना पुणे-मुंबई महामार्ग सुरू करण्याची मागणी नागरिक आणि राजकीय पक्षांकडून होत होती. उड्डाणपुलावरील मुंबई-पुणे या एका लेनचे काम पूर्ण झाले असल्याने ही एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.
महापौरांच्या अगोदर राष्ट्रवादीने केले उदघाटन!
दरम्यान, महापौर यांच्या हस्ते उदघाटन होण्यापूर्वीच बुधवारी राष्ट्रवादीकडून उड्डाणपुलाचे उदघाटन करण्यात आले होते.