पिंपरी-चिंचवड - गलेलठ्ठ पगार असलेल्या तरुणींना लग्नाचे अमिश दाखवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. निशांत रमेशचंद्र नंदवाना (वय - 33) आणि विशाल हर्षद शर्मा ( वय - 33 ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी आत्तापर्यंत तब्बल 255 तरुणींना दीड कोटींचा गंडा घातल्याच समोर आले आहे. तर अनेक तरुणींच लैंगिक शोषण केल्याचे काही तक्रारीत म्हटले आहे. आरोपी हे वेगवेगळ्या नावांनी तरुणींना फसवत असल्याची माहिती आहे.
अशी करत होते फसवणुक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशांत आणि विशाल या दोघांनी पुणे, बंगळुरु आणि गुरगाव येथे शेकडो तरुणींना आर्थिक गंडा घातल्याच समोर आले आहे. दोघेही विविध शहरातील तरुणींना लग्न जुळवण्याच्या वेबसाइटवरून जवळीक साधायचे. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे भासवून तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. दरम्यान, मला व्यवसाय करायचा आहे. त्यासाठी मी लाखो रुपयांची जुळवाजुळव केली आहे. परंतु, काही लाख कमी पडत आहे, असे सांगून आणि आपलेच भविष्य सेट होईल, असे भावनिक आवाहन करून ते तरुणींना फसवत असे. अनेक तरुणींचे त्यांनी लैंगिक शोषण केले असल्याचे पुढे आले असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
75 लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपी विशाल आणि निशांत यांना बंगळुरु येथून वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता पुणे, बंगळुरु आणि गुरगाव येथील तब्बल 255 तरुणींना लग्नाचे अमिश दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे पुढे आले आहे. आत्तापर्यंत तब्बल दीड कोटीपर्यंत हा आकडा गेला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे. आरोपींकडून बनावट कागदपत्रे, महागड्या घड्याळ, गाड्या, रोख रक्कम असा एकूण 75 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
हेही वाचा - Mcoca act : नागपूर पोलिसांची कारवाई; तीन टोळ्यांवर लावला मोक्का