पुणे - शहर आणि उपनगरात सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. पुण्यातील पेठांसह कोथरूड, धायरी, वडगावशेरी वाघोली या परिसरात दमदार पाऊस झाला. दरम्यान अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
जून महिन्याच्या 8 तारखेला शहरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले होते. त्यानंतर पाऊस गायबच झाला होता. त्यानंतर मध्यन्तरी तुरळक पाऊस आला होता. परंतु आज दुपारी मात्र पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
एरवी जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणारा पाऊस यावर्षी जरा उशिराने आला. त्यामुळे तापमानात वाढ झाली होती. मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण होते, पण पाऊस पडत नव्हता. अखेर सोमवारी ही प्रतीक्षा संपुष्टात आली आणि शहरात पाऊस दाखल झाला.
राज्यातील अनेक भागात अजूनही म्हणावा तसा पाऊस पडला नाही. पुणे वेधशाळेतील शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी आज सकाळी बोलताना सोमवारी आणि मंगळवारी पुण्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. तर कोकण आणि गोव्यात 24 ते 28 या कालावधीत पाऊस पडेल. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.