पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन आहे. या बंदमधून जीवनावश्यक वस्तूंना वगळण्यात आले आहे. मात्र, ५ दिवसांच्या बंदनंतर बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची उपबाजारात शनिवारी फळभाज्या व भाजीपाल्याचे लिलाव झाले. या लिलावात पालेभाज्या १५५० पेंड्या तर, फळभाज्या व फळे मिळून ४०० क्विंटल शेतमालाची आवक झाली. दरम्यान, ५ दिवस बाजार समिती बंद राहिल्याने शेतकरी व बाजार समितीचे जवळपास ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले.
शेतकऱ्यांची व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी भाजीपाल्याचे लिलाव सुरू करण्यात आले आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी उपाय योजना म्हणून शनिवारी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत जळोची उपबाजार समिती येथे भाजीपाल्याचे लिलाव सुरू होते. असे असले तरी, शेतकऱ्यांनी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीने अवलंबलेल्या टोकन पद्धतीमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी टाळण्यास मदत झाली. टोकन नंबरनुसार शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची विक्री केली. लिलाव संपल्यानंतर बाजार समितीसह नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी परिसरात स्वच्छ करून औषध फवारणी केली.
बारामतीत ४५ ठिकाणी भाजीपाला विक्री -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी येथील मुख्य भाजीमंडई बंद ठेवून नागरिकांच्या सोईसाठी शहरात ४५ ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जळोची उपबाजार येथील भाजीपाल्याचे लिलाव झाल्यामुळे श्री गणेश मंडई येथील विक्रेत्यांनी भाजीपाला तसेच मंडईची खरेदी करून पोलीस प्रशासन व नगर परिषदेने ठरवून दिलेल्या ठिकाणी मंडईचे स्टॉल टाकले.
एकूण शेतमालाची आवक -
पालेभाज्या १५५० पेंडीफळ, भाज्या २१० क्विंटल, फळे ३० क्विंटल, बटाटा १५० क्विंटल, कांदा १० क्विंटल
तर, नागरिक व शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जळोची उपबाजारात भाजीपाला व फळभाजांचे लिलाव करण्यात आले. मात्र, शेतमालाची नेहमीपेक्षा ५० टक्क्याने आवक घटली. तसेच कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या दुष्टीने टोकन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. त्यामुळे होणारी गर्दी टळली; यासोबतच हात धुण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती.