शिरूर (पुणे) - कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर मोजणीसाठी असणाऱ्या नियमाचा आधार घेऊन खोटे, बनावट कागदपत्र तयार करून आपल्या अधिकाराचा गैरवापर करत अतिक्रमण दाखवून जमिनीचा ताबा दिल्याचा अतिशय गंभीर प्रकार शिरूर तहसीलदार यांच्या कार्यालयात घडल्याचे समोर आला आहे. या कामात चक्क नायब तहसीलदार पदावर काम करीत असलेले ज्ञानदेव यादव यांनी हा प्रकार केल्याची तक्रार उपविभागीय अधिकारी पुणे, विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
शेतकऱ्यांची तक्रार
मांडवगण फराटा येथील वाल्मिक महादेव फराटे, गंगुबाई महादेव फराटे यांच्या मालकीच्या गट नं . २५६/१, २५६/२ या क्षेत्राची हद्द कायम करण्यासाठी अतितातडीच्या सरकारी मोजणी केली. मोजणीमध्ये निघालेल्या अतिक्रमणाचा ताबा देण्यासाठी बोगस कागदपत्रांमध्ये पोलीस बंदोबस्त मिळणेसाठी द्यावयाचे पत्र, मंडल अधिकारी यांना ताबा देण्यासाठी उपस्थित राहण्याबाबतचा आदेश आणि ज्या शेतकऱ्यांकडे अतिक्रमण निघाले आहे, त्या शेतकऱ्यांना द्यावयाचे नोटिसा इत्यादी सर्व काही बोगस आणि बनावट तयार करून संगनमताने अतिक्रमणाचा ताबा दिल्याच्या तक्रारी उपविभागीय अधिकारी पुणे यांच्याकडे मांडवगण फराटा येथील तक्रारदार शेतकरी सचिन गोरख जाधव, अलका बबन शेलार, गोपीचंद सदाशिव फराटे या शेतकऱ्यांनी केली आहे. यामधील मुख्य सुत्रधार नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव हे असून या अधिकाऱ्याला विभागीय अधिकारी पुणे यांनी कारणे दाखवा नोटिस बजावून यादव यांच्याकडून खुलासा मागून घेतला आहे.
बेकायदेशीर अधिकाराचा वापर झाल्याची बाब
या प्रकारामध्ये मांडवगण फराटा येथील वरील गट नं.ची हद्दनिश्चित मोजणी असताना खोटा, बनावट इ बोगस आदेश वापरला. अधिकाराचा गैरवापर करून अतिक्रमण निश्चित झालेले नसताना सुद्धा ताबा देणेसाठी दिवाणी न्यायालयाचे कोणतेही आदेश नसताना प्रत्यक्ष ताबा देण्याचा प्रकारामध्ये बेकायदेशीर अधिकाराचा वापर झाल्याची बाब उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केल्यानंतर निदर्शनास आली. यावर आता यादव यांच्यावर काय कारवाई होते? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
मांडवगण फराटा येथील अतिक्रमणाचा ताबा मिळवण्याबाबत नायब तहसीलदार यादव यांनी त्यांना कुठलाही अधिकार नसताना तहसीलदार म्हणून माझ्या बनावट सह्या करून पोलीस बंदोबस्तासाठी मला न विचारता सदर आदेश काढले असून त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. माझ्या सहीचा गैरवापर हे ज्ञानदेव यादव यांनी केलेले अत्यंत चुकीचे काम आहे. यादव यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई होण्याबाबतचा प्रस्ताव येत्या दोन दिवसांत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवणार असल्याचे तहसीलदार एल. डी. शेख यांनी सांगितलं.