पुणे(बारामती) : निरा-बारामती या राज्य मार्गावरील अतिक्रमणे पुन्हा जैसे थे झाली असून या मार्गावर अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. गेल्या वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील अतिक्रमणे हटविली होती. मात्र, व्यावसायिकांनी पुन्हा सरकारी जागांवर व्यवसाय वाढवले आहेत. अगोदरच कोरोनामुळे विकास कामांना ब्रेक मिळाला आहे. त्यातच अतिक्रमणे करण्याची जणू स्पर्धाच या मार्गावर लागल्याचे चित्र दिसत आहे.
सरकारी जागेत अतिक्रमण करणे ही आता फॅशनच बनली असून अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे यावर कारवाई होत नाही. बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर, वडगाव निंबाळकर, पणदरे, माळेगाव, शारदानगर, कसबा याभागात सर्वाधिक अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी सरकारी अधिकारी रस्त्यावर उतरून अतिक्रमणांवर थेट कारवाई करत आहेत. बारामती तालुका मात्र याला अपवाद ठरत आहे. एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच कारवाई होणार का? असा सवाल वाहनचालक उपस्थित करत आहेत.
कारवाई करण्याची गरज -
माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्याचा गाळप हंगाम सुरु असल्याने अगोदरच रस्त्यावर वाहतुकीचा मोठा ताण आहे. अरुंद रस्ता असल्याने दोन्ही बाजूकडून वाहने आल्यास वाहने क्रॉस करताना अडचण येत आहे. लॉकडाऊन हटवण्यात आल्याने रस्त्याच्या बाजूला भाजीपाला विकणाऱ्यांची संख्या शेकडोंच्या घरात गेली आहे. गर्दी होत असल्याने वाहन चालकांना कसरत करत वाहने पुढे घ्यावी लागत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमणे हटविण्यासाठी रस्त्यावर उतरून कारवाई करण्याची गरज आहे, अशी नागरिकांची मागणी आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे सध्या तरी हे शक्य दिसत नाही.