अहमदनगर - राज्यात सध्या महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष सत्तेत आहेत. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर महाविकास आघाडीत कुरबुर सुरू असल्याचे समोर आले होते. मात्र, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात कोणतेही मतभेद नाहीत. तसेच प्रत्येक पक्षाला पक्षसंघटन वाढवण्याचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीचे नेते अॅड. प्रताप ढाकणे यांच्या वाढदिवसानिमित्त पाथर्डीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील कोरोना योद्ध्यांचा आमदार रोहित पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी बोलताना रोहित पवार पुढे म्हणाले, आगामी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित लावण्याबाबत वरिष्ठ पातळीवरील नेते निर्णय घेतील. याच बरोबर मराठा व ओबीसी समाजाचा आरक्षणाचा प्रश्न हा केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येत असल्याने इम्पिरिकल डाटा केंद्र सरकारने दिल्यास ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण ते करता येऊ शकते.
महाविकास आघाडीतील बिघाडीबाबतच्या चर्चांवर बोलताना पवार म्हणाले की, प्रत्येक पक्षाला आपले संघटन वाढवण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. सरकारमधील तिन्ही पक्षामध्ये संवाद आहेत. त्यामुळे काही वाद होतोच. मात्र संवादातून अडचणी सुटत असतो. तसेच तिन्ही पक्ष एकत्र येऊन सत्तेत आहेत. हे भाजपाच्या जिव्हारी लागला आहे, त्यामुळे थोडा जरी वाद झाला तरी भाजपकडून स्फोट झाल्यासारखे भासवले जाते. भाजपाकडून सोशल मीडियाचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जात असल्याचा आरोपही पवार यांनी केला.